काळजी घ्या! ‘या’ गटातले सर्वाधिक करोनाचे बाधित

वाढत्या संसर्गामध्ये 31 ते 40 वयोगटातील व्यक्तींची संख्या अधिक


सर्वात कमी बाधित संख्या 81 ते 100 या वयोगटातील

पुणे – करोनाच्या वाढत्या संसर्गामध्ये 31 ते 40 या वयोगटातील व्यक्तींची संख्या सर्वाधिक आहे. दि.1 ते 24 फेब्रुवारीदरम्यान शहरात एकूण 8 हजार 455 बाधित सापडले. त्यामध्ये या वयोगटातील 1 हजार 865 बाधित संख्या असून, हे प्रमाण जवळपास 22 टक्के इतके आहे. त्यापाठोपाठ 41 ते 50-1,523 आणि 21 ते 30-1 हजार 450 जणांचा समावेश आहे.

मार्च ते सप्टेंबर 2020 दरम्यान एकूण बाधित संख्येमध्ये 31 ते 50 या वयोगटातील व्यक्तींची संख्या सर्वाधिक होती. आताच्या बाधित संख्येमध्येही याच वयोगटातील संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून येते. नोकरी, व्यवसाय यानिमित्त 25 ते 60 या वयोगटातील व्यक्ती सर्वाधिक वेळ घराबाहेर असतात. त्यामुळे याचे प्रमाण अधिक असल्याचे तज्ज्ञांकडून बोलले जाते. त्यामुळे या गटातील व्यक्तींनी बाहेर पडताना, स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी करोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्‍यक आहे.

फेब्रुवारीच्या पहिल्या दिवसापासून शहरात करोनाचा संसर्ग वाढू लागल्याने राज्य सरकारकडून निर्बंध घालण्यात आले आहे. शाळाही बंद ठेवण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी घराबाहेर पडू नये, सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये, या आवाहनामुळे या 1 ते 20 आणि 61 ते 100 या वयोगटातील व्यक्ती घरीच असतात. त्यामुळे मागील महिनाभरात या गटातील (61 ते 70 वयोगट सोडला तर) बाधित संख्या पाचशेच्या आत आहे. सर्वात कमी बाधित संख्या 81 ते 100 या वयोगटातील आहे.

21 ते 60 वयोगट डेंजर झोनमध्ये
शहरात 21 ते 60 या वयोगटातील करोना बाधित संख्या एक हजाराच्या पुढे आहे. ही संख्या अवघ्या 24 दिवसातील असून, दररोज या संख्येमध्ये वाढ होत आहे. महिनाभरातील एकूण 8 हजार 455 बाधितांपैकी 21 ते 60 वयोगटातील एकूण बाधित संख्या तब्बल 6 हजार 108 इतके आहे. म्हणजेच तब्बल 72 टक्के बाधित या वयोगटातील आहेत. 0 ते 20 या वयोगटातील बाधित सापडण्याचे प्रमाण 10, 61 ते 80 या वयोगटातील बाधित प्रमाण 16 तर 81 ते 100 या वयोगटातील बाधित सापडण्याचे प्रमाण केवळ 2 टक्के आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.