दुबई : – सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत (Asia Cup 2025) पाकिस्तानचा धुव्वा उडवत विजेतेपद पटकावणाऱ्या टीम इंडियाला अद्यापही ट्रॉफी मिळाली नाही. विजेतेपदाची ट्रॉफी एशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) प्रमुख आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी स्वतःजवळ ठेवली आहे. यावर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अत्यंत कठोर भूमिका घेत, नकवी यांना थेट मेल करून ही ट्रॉफी भारताकडे सुपूर्द करण्यास सांगितले आहे. प्रेझेंटेशन सोहळ्यातील ‘हाय-व्होल्टेज’ ड्रामा: सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा दारुण पराभव केला होता. मात्र, सामन्यानंतर झालेल्या पारितोषिक वितरण सोहळ्यात मोठा वाद निर्माण झाला होता. एसीसी प्रमुख या नात्याने मोहसिन नकवी ट्रॉफी देण्यासाठी मंचावर आले होते, पण भारतीय संघाने त्यांच्या हातून ट्रॉफी स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिला. नकवी हे पाकिस्तानचे गृहमंत्रीही असल्याने, त्यांच्या भारतविरोधी भूमिकेमुळे हा निर्णय घेण्यात आला होता. सूत्रांनुसार, टीम इंडिया एसीसीच्या इतर कोणत्याही अधिकाऱ्याकडून ट्रॉफी घ्यायला तयार होती, पण नकवी हे स्वतःच ट्रॉफी देण्यावर ठाम होते. यामुळे कोणताही प्रेझेंटेशन सोहळा न होता तो कार्यक्रम तडकाफडकी संपवण्यात आला. त्यानंतर मोहसिन नकवी ट्रॉफी आणि मेडल्स घेऊन मंचावरून निघून गेले आणि त्यांनी ती एसीसीच्या मुख्यालयात ठेवली. बीसीसीआयचा सज्जड इशारा: या संपूर्ण प्रकारानंतर आता बीसीसीआयने थेट कारवाईची धमकी दिली आहे. बीसीसीआयने कथितरित्या एसीसी प्रमुख मोहसिन नकवी यांना ईमेल पाठवला असून त्यात भारताला ही विजेतेपदाची ट्रॉफी त्वरित सोपवण्याची मागणी केली आहे. बीसीसीआयने या ईमेलमध्ये नकवी यांना स्पष्टपणे सांगितले आहे की, जर त्यांच्याकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, तर बीसीसीआय हे प्रकरण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) घेऊन जाईल आणि त्यांच्याकडे तक्रार नोंदवेल. मैदानावरही तणावाचे वातावरण: संपूर्ण आशिया चषक स्पर्धेदरम्यान भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्येही तणावाचे वातावरण होते. भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन (Handshake) करण्यास नकार दिला होता. याउलट, पाकिस्तानी खेळाडूंनी वारंवार ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान भारताची ६ विमाने पाडल्याचा खोटा दावा करणारे ‘६-०’ चे हातवारे केले होते, ज्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांमधील तणाव मैदानावरही दिसून आला. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे तीन वेळा सामने झाले आणि तिन्ही वेळा टीम इंडियानेच विजय मिळवला होता.