कोहलीबाबत बीसीसीआय घेणार आश्चर्यकारक निर्णय

लंडन –भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर असून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मात्र, या मालिकेनंतर भारतीय खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होणार असून त्यानंतर टी-20 विश्वकरंडक स्पर्धाही होत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर क्रिकेटच्या तीनही प्रकारात तीन भिन्न कर्णधार असावेत का याची चाचपणी बीसीसीआय करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे सध्याचा कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीबाबतही काही आश्चर्यकारक निर्णय घेतले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
भारतीय संघासाठी आणि कर्णधार कोहलीसाठी ही स्पर्धा खूप महत्त्वाची मानली जात आहे. लॉर्डस कसोटीत मिळवलेल्या अविस्मरणीय विजयामुळे कोहलीवरील दडपण कमी झाले आहे. मात्र, कोहलीचे कर्णधारपद अमिरातीत होणाऱ्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेतील निकाल व कामगिरीवर अवलंबून असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळेच कोहलीने बीसीसीआयच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्याची माहिती मिळत आहे.
लॉर्डसवर झालेल्या कसोटीदरम्यान कोहली, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शहा आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्यात बैठक झाल्याचे समजले असून या बैठकीत टी-20 विश्वकरंडकाच्या तयारीसह अन्य काही गोष्टींवरही चर्चा झाल्याचे समजते.
भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. ही मालिका 14 सप्टेंबरला संपणार असून त्यानंतर 19 सप्टेंबरपासून आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार आहे. टी-20 विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी भारतीय खेळाडूंना एकत्रित टी-20 सामना खेळण्याची संधीच मिळणार नसल्याचेही स्पष्ट झाले असल्याने या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे.
विश्वकरंडक आराखड्यावर चर्चा
आयसीसीच्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी प्रत्यक्ष कृती आराखडा तयार करण्यासाठी प्राथमिक चर्चा सुरू आहे. या चर्चेत भारतीय संघातील खेळाडूंना तयारीसाठी कोणत्या अडचणी आहेत किंवा कोणत्या गोष्टींची गरज आहे यावर सध्या कर्णधार विराट कोहली व बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि जय शहा यांची चर्चा होत आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताला 2017 सालच्या चॅम्पियन्स करंडकामध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तर 2019 सालच्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. त्याशिवाय जून महिन्यात झालेला जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेचा अंतिम सामनासुद्धा भारताने गमावला. त्यामुळे टी-20 विश्वकरंडक कोहलीच्या नेतृत्वाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरेल.





