Team India New Bowling Coach :- दक्षिण आफ्रिकेचे माजी गोलंदाज मॉर्नी मॉर्केल यांची भारतीय क्रिकेट संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते 1 सप्टेंबरला संघात सामील होतील अशाही सुऊल. क्रिकेट वेबसाइट क्रिकबझने बुधवारी, 14 ऑगस्ट रोजी जय शहांच्या हवाल्याने ही माहिती दिली.
दक्षिण आफ्रिकेच्या 39 वर्षीय माजी गोलंदाज असणाऱ्या मॉर्केलला गोलंदाजी प्रशिक्षक बनवण्याची चर्चा आधीपासूनच होती. असे सांगण्यात येत आहे की, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी मॉर्केलला गोलंदाजी प्रशिक्षक बनवण्याची मागणी केली होती. दोघांनी आयपीएल फ्रँचायझी लखनऊ सुपर जायंट्ससाठी एकत्र काम केले आहे. अशाप्रकारे मॉर्केल हे माजी भारतीय प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांची जागा घेतील.
म्हांब्रेचा कार्यकाळ आधीच संपला होता, परंतु मॉर्केल वैयक्तिक कारणांमुळे श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडियामध्ये सामील होऊ शकला नाही. अशा परिस्थितीत बीसीसीआयने साईराज बहुतुले यांना गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून पाठवले होते. आता मॉर्नी मॉर्केल बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात सामील होणार आहेत. 19 सप्टेंबरपासून सुरू होणारी ही मालिका मॉर्केलची पहिली परिक्षा असेल. यामध्ये 2 कसोटी आणि 3 टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. पहिली कसोटी चेन्नईत होणार आहे.
मॉर्केलची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
मॉर्नी मॉर्केल यांनी दक्षिण आफ्रिकेसाठी 86 कसोटी सामने खेळले आहेत आणि 309 विकेट्स घेतल्या आहेत. त्यांनी 117 एकदिवसीय सामने देखील खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांच्या नावावर 188 विकेट आहेत. जर आपण टी-20 इंटरनॅशनलमध्ये त्यांनी 44 सामने खेळून 47 विकेट घेतल्या आहेत. अशाप्रकारे आपल्या कारकिर्दीत मॉर्केल भेदक गोलंदाज ठरलेले आहेत.
पाकिस्तानचा गोलंदाजी प्रशिक्षकही
मॉर्केल पाकिस्तान क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक देखील राहिले आहेत. 2023 च्या विश्वकरंडकातील निराशाजनक कामगिरीनंतर त्यांनी पाकिस्तान संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. मॉर्केल गेल्या वर्षी जूनमध्ये सहा महिन्यांच्या करारावर पाकिस्तानी संघात सामील झाले होते. नंतर त्यांनी करार पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा दिला होता.