#U19CWC | विश्वविजेत्या युवा संघाचा बीसीसीआयकडून सत्कार

अहमदाबाद – आयसीसी 19 वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मिळवणाऱ्या भारताच्या युवा संघाचा खास सत्कार बीसीसीआयच्या वतीने बुधवारी येथे करण्यात आला. वेस्ट इंडिजमध्ये नुकत्याच पार पडलेल्या या स्पर्धेतील विजेत्या संघाने येथे सुरू असलेल्या भारत व वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला उपस्थिती राखली होती. सामन्याच्या उपहाराच्या वेळेत हा सत्कार सोहळा साजरा करण्यात आला.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सोहळ्यात बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी खेळाडू, मुख्य प्रशिक्षक ऋषीकेश कानिटकरसह सपोर्ट स्टाफचाही गौरव केला. यावेळी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) संचालक व्हीव्हीएस लक्ष्मण, बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ तसेच गुजरात क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
विश्वकरंडक विजेत्या संघातील खेळाडूंना प्रत्येकी 40 लाख तर प्रशिक्षसाकह सपोर्ट स्टाफच्या प्रत्येक सदस्याला 25 लाख रुपयांचे बक्षीस बीसीसीआयने जाहीर केले होते त्याचेही वितरण यावेळी करण्यात आले.
या स्पर्धेत भारताच्या युवा संघाने इंग्लंडचा पराभव करत करंडक मायदेशात आणताना स्पर्धेच्या इतिहासात पाचवे विक्रमी विजेतेपद साकार केले होते.






