मुंबई – भारताचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा याला धमकावल्याप्रकरणी बीसीसीआयने वरिष्ठ क्रीडा पत्रकार बोरिया मुजुमदार यांच्यावर कठोर कारवाई केली आहे. त्यांचयवर बीसीसीआयने दोन वर्षांची बंदी लावली असून, या कालावधीत त्यांना क्रिकेट सामना तसेच त्यासंबंधित कोणत्याही वार्तांकनासाठी मैदानात प्रवेश करण्यास बंदी असेल. तसेच आयसीसीकडे पत्रव्यवहार करण्यात आला असून, मुजुमदार यांच्यावर त्यांनीही कारवाई करावी, अशी विनंती बीसीसीआयने केली आहे. साहाच्या वक्तव्यांची चौकशी करण्यासाठी बीसीसीआयने त्रीसदस्यीय समिती स्थापन केली होती. त्यांनी दिलेल्या अहवालानुसारच ही कारवाई करण्यात आल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. आता बीसीसीआयने सर्व राज्य संघटनांनाही त्याची माहिती कळवली आहे. साहाने याबाबत गेल्या 19 फेब्रुवारीला खुलासा केला होता व याबाबत बोरिया यांच्याशी झालेला संवादही उघड केला होता. साहा याला मुलाखत देण्यासाठी धमकावले असल्याचे त्याने ट्विट केलेल्या स्क्रीनशॉटमधून स्पष्ट झाले आहे. भारतीय क्रिकेटमधील माझ्या कामगिरीनंतर मला एका पत्रकाराकडून धमकी मिळाली होती, असा आरोप साहाने केला होता. साहाने केलेल्या खुलाशानंतर अनेक माजी क्रिकेटपटूंनी मुजुमदार यांच्यावर संताप व्यक्त केला होता. चौकशी समितीसमोर आपले मत मांडताना साहाने मुजुमदार यांचे नाव उघड केले होते.