Team India New Coach : भारतीय महिला क्रिकेट संघाची ताकद आणि तंदुरुस्ती वाढवण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एक महत्त्वाचा पाऊल उचलले आहे. महिला संघाच्या ‘स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग’ प्रशिक्षकपदी इंग्लंडचे अनुभवी तज्ज्ञ निकोलस ली यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून ते आपला पदभार स्वीकारतील. डब्ल्यूपीएलनंतर होणार संघात सामील – निकोलस ली यांची नियुक्ती महिला प्रीमियर लीग (WPL 2026) संपल्यानंतर केली जाईल. यावर्षीची ‘डब्ल्यूपीएल’ ९ जानेवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान खेळवली जाणार आहे. ही लीग संपल्यानंतर लगेचच भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलियाच्या महत्त्वाच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे. १५ फेब्रुवारी ते ९ मार्च या कालावधीत ऑस्ट्रेलियात विविध फॉरमॅटमधील मालिका खेळल्या जातील आणि याच दौऱ्यात ली भारतीय संघासोबत जोडले जातील. अफाट अनुभवाचा संघाला होणार फायदा – निकोलस ली हे केवळ प्रशिक्षक नसून त्यांना मैदानातील खेळाचाही अनुभव आहे. ते माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू असून त्यांनी १३ सामन्यांत ४९० धावा केल्या आहेत. प्रशिक्षक म्हणून त्यांची कारकीर्द अत्यंत प्रभावी राहिली आहे: अफगाणिस्तान: जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२५ पर्यंत अफगाणिस्तान पुरुष संघाचे स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच. बांगलादेश: मार्च २०२० ते जानेवारी २०२४ पर्यंत बांगलादेश क्रिकेट बोर्डात ‘फिजिकल परफॉर्मन्स हेड’ म्हणून कार्यरत. श्रीलंका: २०१५ ते २०२० या काळात श्रीलंका पुरुष संघासोबत कामाचा अनुभव. अलीकडील अनुभव: यूएईच्या ILT20 लीगमध्ये ‘गल्फ जायंट्स’ संघासोबत त्यांनी काम केले आहे. हेही वाचा – MS Dhoni Pension : निवृत्तीनंतरही ‘कॅप्टन कूल’ची चांदी! सचिनसह माहीला दरमहा मिळते ‘इतकी’ पेन्शन; युवराजला किती? ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी फिटनेसवर भर – भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियाच्या वेगवान आणि उसळत्या खेळपट्ट्यांवर तग धरण्यासाठी उच्च दर्जाच्या फिटनेसची गरज आहे. निकोलस ली यांचा आशियाई आणि आंतरराष्ट्रीय संघांसोबतचा अनुभव भारतीय खेळाडूंची शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरेल. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे महिला संघाच्या कामगिरीत मोठी सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.