भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दक्षिण आफ्रिका ए विरुद्धच्या आगामी चार दिवसीय दोन सामन्यांच्या मालिकेसाठी इंडिया ए संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबाबत माहिती जाहीर केली. ही मालिका 30 ऑक्टोबरपासून बंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई) येथे खेळवली जाणार आहे. ऋषभ पंतकडे नेतृत्वाची धुरा इंडिया ए संघाचे नेतृत्व विकेटकीपर-फलंदाज ऋषभ पंतकडे सोपवण्यात आले आहे, तर साई सुदर्शन याला उपकर्णधारपदी नियुक्त करण्यात आले आहे. या संघात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. मात्र, सर्फराज खान याला संघात स्थान न मिळाल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मालिकेचे वेळापत्रक इंडिया ए आणि दक्षिण आफ्रिका ए यांच्यातील पहिला चारदिवसीय सामना 30 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2025 दरम्यान खेळवला जाईल. दुसरा आणि अंतिम सामना 6 ते 9 नोव्हेंबर 2025 दरम्यान होणार आहे. हे दोन्ही सामने बंगळुरू येथील बीसीसीआय सीओई मैदानावर रंगणार आहेत. पंतचे दुखापतीनंतर पुनरागमन ऋषभ पंत या मालिकेतून मैदानावर पुनरागमन करण्यास सज्ज आहे. इंग्लंड दौऱ्यावरील कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात पायाला झालेल्या दुखापतीमुळे पंतला जवळपास दोन महिने मैदानाबाहेर राहावे लागले. आता पूर्णपणे तंदुरुस्त झालेला पंत इंडिया ए संघाचे नेतृत्व करताना दिसेल. विशेष म्हणजे, या मालिकेतील कामगिरीच्या जोरावर पंतला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतही स्थान मिळू शकते. टीम इंडियाचे वेळापत्रक सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे, जिथे ते तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यानंतर भारतीय संघ मायदेशी परतून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. इंडिया ए आणि दक्षिण आफ्रिका ए यांच्यातील ही मालिका भारतीय खेळाडूंसाठी महत्त्वाची संधी ठरणार आहे. या मालिकेतून युवा खेळाडूंना आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळणार असून, पंतच्या नेतृत्वाखाली इंडिया ए संघ कशी कामगिरी करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. पहिल्या 4 दिवसीय सामन्यासाठी इंडिया ए टीम ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), आयुष म्हात्रे, एन जगदीसन (विकेटकीपर), साई सुदर्शन (उपकर्णधार), देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, हर्ष दुबे, तनुष कोटीयन, मानव सुथार, अंशुल कंबोज, यश ठाकुर, आयुष बदोनी आणि सारांश जैन. दुसऱ्या आणि अंतिम 4 दिवसीय सामन्यासाठी इंडिया ए टीम ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), केएल राहुल, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), साई सुदर्शन (उपकर्णधार), देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, हर्ष दुबे, तनुष कोटियन, मानव सुथार, खलील अहमद, गुरनूर ब्रार, अभिमन्यू इसवरन, प्रसीध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप.