IPL 2025 New Rules : आयपीएलसाठी बीसीसीआयने ड्रेस कोड पासून ते खेळाडूंच्या प्रवासापर्यंत लागू केले ‘हे’ नियम

येत्या 22 मार्च पासून IPL 2025 ला सुरुवात होणार आहे. यंदाचा हा स्पर्धेचा 18 वा सीझन असणार आहे. यंदाच्या 18 व्या सीजनसाठी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने म्हणजेच बीसीसीआयने काही नवीन नियमांची घोषणा केली आहे. यात ड्रेस कोड पासून ते प्रवासातील निर्बंधांशी निगडित अनेक नियमांचा समावेश आहे. जर कोणत्याही खेळाडूने या नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर आणि फ्रेंचायझीवर कारवाई करण्यात येईल. आता हे नियम कोणते आहेत जाणून घेऊया…
1) प्रवास
बीसीसीआयने दिलेल्या नियमांनुसार सरावासाठी आणि सामन्याच्या दिवशी हॉटेलपासून स्टेडियम पर्यंतचा प्रवास संघातील सर्व खेळाडूंनी एकत्र टीम बसमधूनच करावा. तसेच या टीम बसमधून कुटुंब आणि मित्रांना प्रवास करण्याची परवानगी नसणार आहे.
2) कुटुंबाला ड्रेसिंग रूममध्ये जाण्यास मनाई
मागील सीजन प्रमाणेच याही सिझनमध्ये क्रिकेटर्सच्या कुटुंबातील व्यक्ती किंवा मित्रांना सामन्यापूर्वी किंवा सामन्यादरम्यान ड्रेसिंग रूममध्ये किंवा मॅच ऑफिशिअल एरियामध्ये जाण्यास सक्त मनाई असणार आहे.
3) खेळाडूला अतिरिक्त सरावास मनाई
संघांना सराव क्षेत्रात केवळ दोन नेट्स आणि रेंज हिटिंगसाठी एका बाजूच्या विकेटची परवानगी आहे. संघाचा सराव लवकर संपल्यास कोणत्याही खेळाडूला अतिरिक्त सरावास परवानगी दिली जाणार नाही.
4) सामन्याच्या दिवशी फिटनेस टेस्ट देता येणार नाही
सामन्याच्या दिवशी कोणत्याही खेळाडूला सराव अथवा फिटनेस टेस्ट देण्यास परवानगी नसणार आहे. यामुळे खेळपट्टी सुरक्षित आणि चांगल्या स्थितीत राहील.
5) अधिकृत ओळखपत्र सोबत ठेवावे
सामन्याच्या दिवशी किंवा सरावादरम्यान सर्व मान्यताप्राप्त कार्ड धारकांनी त्यांना देण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र सोबत ठेवावे. तसे न केल्यास आधी त्यांना वॉर्निंग देण्यात येईल आणि पुन्हा अशी चूक झाल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
6) LED स्पॉन्सरशिप बोर्ड
अनेकदा चेतावणी देऊन सुद्धा खेळाडू वारंवार बॉल LED स्पॉन्सरशिप बोर्डवर मारतात. बीसीसीआयने हे नुकसान टाळण्यासाठी आता नियम मजबूत केला आहे.
7) ऑरेंज आणि पर्पल कॅपचा नियम
ज्या खेळाडूंना स्पर्धेदरम्यान ऑरेंज आणि पर्पल कॅपने सन्मानित करण्यात येईल. अशा खेळाडूंनी या कॅप सामन्यादरम्यान कमीत कमी दोन ओव्हर्स तरी घालाव्यात असा नियम बीसीसीआयकडून करण्यात आला आहे.
8) ड्रेस कोड नियम
सामन्यानंतर होणाऱ्या इवेंट्ससाठी क्रिकेटर्सनी ड्रेस कोडच्या नियमांचे अनुसरण करणे आवश्यक आहे. यादरम्यान खेळाडूंनी स्लीव्हलेस जर्सी आणि फ्लॉपीजवर घालू नये. खेळाडूंनी याचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
9) कार्ड धारक असलेले सपोर्ट स्टाफ
सामन्याच्या दिवशी प्रत्येक संघासोबत केवळ 12 मान्यताप्राप्त कार्ड धारक असलेले सपोर्ट स्टाफ असतील. यात टीम डॉक्टर आणि इतर स्टाफचा समावेश असेल. हा नियम आयपीएल 2024 मध्ये सुद्धा बीसीसीआयकडून लागू करण्यात आला होता.
10) जर्सी क्रमांक बदलण्याबाबत
कपड्यांच्या आणि उपकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ज्या खेळाडूंना जर्सी क्रमांक बदलायचा आहे त्यांनी कमीतकमी 24 तास अगोदर बीसीसीआयला याबाबत माहिती द्यायला हवी.





