‘बारसू’ला ठाकरेंचा विरोध, राष्ट्रवादीचा नाही? अजित पवार यांनी स्पष्टच सांगितलं…

पुणे – रत्नागिरी जिल्ह्यातील बारसूमध्ये रिफायनरीवरून वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. बारसू रिफायनरीला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने या प्रकल्पाला जोरदार विरोध दर्शवला आहे. अशातच आज विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारपरिषद घेत याबाबत आपली भूमिका मांडली. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विकासाला विरोध नाही, मात्र पर्यावरणाचा ह्रास नको’ अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली.
यावेळी पत्रकारांनी अजित पवार यांनी ठाकरे गटातर्फे प्रकल्पाला करण्यात येत असलेल्या विरोधाबाबत विचारले. यावर उत्तर देताना अजित पवार यांनी, ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी प्रकल्पाला पाठिंबा दिला असल्याची आठवण करून दिली. यासोबतच त्यांनी, ज्यांचा या प्रकल्पाला ज्यांचा विरोध आहे त्यांच्यासोबत चर्चा केल्यास यावर मार्ग निघू शकतो असेही सांगितले.
उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवरही भाष्य
यावेळी अजित पवार यांनी, उद्धव ठाकरे यांनी हा प्रकल्प व्हावा यासाठी केंद्राला पत्र लिहले होते, मात्र आता स्थानिकांचा या प्रकल्पाला विरोध असल्याने आपण त्यांच्यासोबत असल्याची भूमिका मांडली असल्याचे सांगितले. तसेच याबाबत १ मे रोजी होणाऱ्या वज्रमूठ सभेत आपण त्यांच्याशी याबाबत संवाद साधणार असल्याचेही पवार म्हणाले.
लाखो रोजगार उपलब्ध होणार
यावेळी बोलताना अजित पवार यांनी या प्रकल्पातून लाखो रोजगार उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. एकीकडे राज्यातील प्रकल्प दुसऱ्या राज्यांमध्ये जात असताना एखादा प्रकल्प महाराष्ट्रात येत असेल तर राष्ट्रवादीचा त्याला विरोध असणार नाही. बेरोजगारीचा प्रश्न भेडसावत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचा विकासाला पाठिंबाच आहे, मात्र यातून पर्यावरचा ह्रास होऊ नये असे पवार यांनी स्पष्ट केले.
उदय सामंत – शरद पवार यांच्यात चर्चा
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात बारसू रिफायनरींबाबत चर्चा झाल्याचे अजित पवार यांनी सांगितले. शरद पवार यांनी देखील याबाबत भूमिका मांडताना विकासाला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध नसल्याचे सांगितल्याची आठवण अजित पवार यांनी यावेळी करून दिली.





