बऱ्हाटेचे अटक वॉरंट ‘सार्वजनिक’

घरासह सार्वजनिक ठिकाणी पोलिसांनी चिकटवली कॉपी
पुणे – माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेचे न्यायालयाने अटक वॉरंट काढले आहे. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकावून खंडणी मागितल्याप्रकरणात कोथरूड पोलिसात हा गुन्हा दाखल आहे. हे वॉरंट धनकवडी, सहकारनगर, लुल्लानगर, लोहियानगर अशा शहरातील विविध मोक्याच्या ठिकाणी लावले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर ही कारवाई केली. शिवाजीनगर न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी हे वॉरंट काढले आहे.
निलंबित पोलीस कर्मचारी शैलेश जगताप, स्वयंघोषित पत्रकार देवेंद्र जैन, अमोल चव्हाणसह एका महिलेसह बऱ्हाटे याच्यावर गुन्हा दाखल आहे. इतर सर्वांना पोलिसांनी अटक केली असून, सर्वांनी जामीन मिळविला आहे. याबाबत सुधीर कर्नाटकी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून बऱ्हाटे या प्रकरणात फरार आहे.
सत्र, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. या पार्श्वभूमीवर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी हे अटक वॉरंट काढले आहे. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कोथरूड पोलिसाची आहे. पोलिसांनी त्याच्या घरी जावून पाहणी केली.
मात्र, तो मिळून आला नाही. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वॉरंट लावले आहे. सर्वात जास्त कॉपी धनकवडी, सहकारनगर भागांत लावल्या आहेत. त्यानंतर लुल्लानगर येथेही लावल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर त्याने पोलिसांसमोर हजर होणे गरजेचे होते. मात्र, त्याने तसे केले नसून, तो अद्याप पोलिसांसमोर हजर झालेला नाही. ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर अटक वॉरंट बजावले आहे. एक कॉपी घराला लावली आहे. शिवाय, सार्वजनिक ठिकाणीही कॉपी लावण्यात आली आहे. त्यामुळे याबाबतची माहिती लोकांना माहीत होणार आहे.
– किरण बालवडकर, पोलीस निरीक्षक





