Bareilly Violence Update: मौलाना तौकीर रझा कोण आहेत? काँग्रेसनंतर समाजवादी पक्षाशीही संबंध…

Bareilly Violence Update: उत्तर प्रदेशातील बरेली येथे झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणात मौलाना तौकीर रझा यांच्यासह एकूण आठ जणांना अटक करण्यात आली असून, त्यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
हिंसाचार आणि पोलिस कारवाई –
बरेली येथील हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी ३६ हून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे. याशिवाय, २,००० अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. जिल्हाधिकारी अविनाश सिंह आणि वरिष्ठ पोलिस अधीक्षक अनुराग आर्य यांनी सांगितले की, मौलाना तौकीर रझा यांच्यासह आठ दंगलखोरांना अटक करून त्यांना कोर्टात हजर केल्यानंतर १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत जेलमध्ये पाठवण्यात आले आहे.
अटक केलेले आरोपी कोण?
आरोप आहे की, मौलाना तौकीर रजा यांनी शुक्रवारी बरेली येथे भडकाऊ वक्तव्य करून हिंसाचार भडकावला. यानंतर तरुणांचा जमाव रस्त्यावर उतरला आणि दगडफेक, तोडफोड आणि निदर्शने झाली. वरिष्ठ पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, मौलाना तौकीर रजा, सरफराज, मनीफुद्दीन, अजीम अहमद, मो. शरीफ, मो. आमिर, रेहान आणि शमीम यांना अटक करून जेलमध्ये पाठवण्यात आले आहे.
मौलाना तौकीर रजा कोण आहेत?
मौलाना तौकीर रजा हे बरेली येथील एक प्रमुख धार्मिक नेते म्हणून ओळखले जातात. ते इत्तेहाद-ए-मिल्लत काउंसिलचे प्रमुख आहेत आणि आला हजरत खानदानाशी त्यांचा संबंध आहे. २००१ मध्ये तौकीर रजा यांनी राजकारणात प्रवेश केला आणि स्वतःची राजकीय पार्टी स्थापन केली. २००९ मध्ये ते काँग्रेससोबत जोडले गेले. २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी समाजवादी पक्षाला (सपा) पाठिंबा दिला, तर २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी बहुजन समाज पक्षाला (बसपा) समर्थन दिले.
विवादांशी जुना संबंध –
मौलाना तौकीर रजा यांचा विवादांशी जुना संबंध आहे. यापूर्वीही त्यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. २०१० मध्येही त्यांच्यावर बरेलीत दंगल भडकावण्याचा आरोप होता.





