जळोची (बारामती) – बारामती शहर पोलिसांनी महिला व मुलींवर अत्याचार करणाऱ्या तीन वेगवेगळ्या गुन्हयातील आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. बारामतीतील एका अल्पवयीन मुलीला 14 डिसेंबर 2021 रोजी फुस लावून पळून नेल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल होती. त्याचा तपास पोलीस करत होते. मात्र त्या दोघांचा तांत्रिक विश्लेषण करून ही सुगावा लागत नव्हता. मात्र पोलिसांनी मोठ्या सिताफिने आरोपी आदित्य धनाजी गायकवाड (वय 20 वर्षे रा.पानसरे अपार्टमेंट कृष्णाई लॉन्स, बारामती) याला पुणे येथून अटक केली आहे. त्याच्यावर पोस्को व कलम 376 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे.
तर दुसऱ्या घटनेत 23 ऑगस्ट पासून स्वतःच्या नात्यातील अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करून तिच्याबरोबर बळजबरीने शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी क्षितिज उर्फ ऋतिक सुनील गरड (वय 22 वर्षे रा. जेऊर ता. करमाळा सध्या रा. रुईफाटी) याला सुद्धा पोलिसांनी ठाणे शहरातून अटक केली आहे. त्याच्यावर सुद्धा पोस्को व 376 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
तिसऱ्या घटनेमध्येत एका महिलेवर ओळखीचा फायदा घेऊन तिला काही वर्षापासून मारहाण करणे, दमदाटी करणे, दुखापत करणे, यासारख्या अत्याचार करून तिच्याबरोबर शरीरसंबंध ठेवल्याप्रकरणी होमगार्ड म्हणून काम करणारा सुजित सुनील घाडगे (वय 26 वर्ष, रा. गौतम नगर बारामती) याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
या तिन्ही गुन्ह्यांचा तपास व अटकेची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे, मुकुंद पालवे, संध्याराणी देशमुख, पोलीस कर्मचारी अंकुश दळवी, देवेंद्र खाडे, अनिल सातपुते, दशरथ कोळेकर, तुषार चव्हाण, दशरथ इंगोले यांनी केली.
“अल्पवयीन मुलीला तिच्या संमतीने घेऊन जाणे हा सुद्धा गुन्हा आहे. अल्पवयीन मुलींना फुस लावून प्रेमाच्या जाळ्यात अडकवून जर त्यांना त्यांच्या पालकांच्या संमतीशिवाय घेऊन गेला तर या गुन्ह्याला पोस्को कलम लागते. यापुढे पोलिसांकडून अशा गुन्हेगारावर सक्त व तात्काळ कारवाई करणार.” – सुनील महाडिक, पोलीस निरीक्षक, बारामती शहर