Baramati : अजितदादांना समर्पित बारामती पावर मॅरेथॉन
Baramati : ३० स्टॉल्सचा भव्य स्पोर्ट्स एक्स्पो, विविध मनोरंजनाचे कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांमुळे हा सोहळा केवळ मॅरेथॉनपुरता मर्यादित न राहता क्रीडा आणि मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे.

बारामती : क्रीडानगरी म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या बारामतीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने आयोजित चौथ्या पर्वातील ‘बारामती पॉवर मॅरेथॉन २०२६’च्या माध्यमातून शहरात तीन दिवसांचा भव्य क्रीडा महोत्सव रंगणार आहे. (दि.२७) ते (दि.२९) या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवात ७ हजार २७० धावपटू सहभागी होणार असून, धावपटूंसाठी १० लाख रुपयांची पारितोषिके ठेवली आहेत. ३० स्टॉल्सचा भव्य स्पोर्ट्स एक्स्पो, विविध मनोरंजनाचे कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांमुळे हा सोहळा केवळ मॅरेथॉनपुरता मर्यादित न राहता क्रीडा आणि मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे.
लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनातून आणि भक्कम पाठबळातून सुरू झालेली ही मॅरेथॉन यंदा त्यांना समर्पित केली आहे. त्यांच्या कार्याची गौरवगाथा आणि खेळाच्या माध्यमातून त्यांनी जोपासलेली समाजहिताची संकल्पना या मॅरेथॉनच्या निमित्ताने पुढे नेली जाणार आहे. नॅशनल एग को-ऑर्डिनेशन कमिटी, डेक्कन चिकन यांच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन केले आहे.
मॅरेथॉन महोत्सवाचा प्रारंभ शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी स्पोर्ट्स एक्स्पो, बिब वितरण केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार आहे. एक्स्पोमध्ये ३० स्टॉल्स उभारण्यात येणार आहे. विविध आंतरराष्ट्रीय क्रीडा ब्रँड्सची उत्पादने बारामतीकरांना पाहता आणि खरेदी करता येणार आहेत. शुक्रवार, शनिवार या दोन दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत स्पोर्ट्स एक्स्पो, बिब वितरण सुरू राहणार आहे. मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या धावपटूंना आपले बिब आणि स्पर्धेचे किट याच कालावधीत वितरित केले जाणार आहे.
यंदाच्या मॅरेथॉनमध्ये एकूण १० लाख रुपयांची पारितोषिके ठेवली आहेत. ४२ किमी, २१ किमी, १० किमी आणि ५ किमी अशा चारही प्रकारांमध्ये विविध वयोगटांनुसार पारितोषिकांची व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रत्येक गटातील प्रथम तीन धावपटूंना गौरविण्यात येणार आहे. मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदविणाऱ्या शाळा, महाविद्यालये आणि रनिंग ग्रुप यांचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे. सर्वाधिक धावपटूंची नोंदणी करणाऱ्या संस्थांना आणि समूहांना ट्रॉफी देऊन गौरविणार असल्याने शैक्षणिक संस्था, क्रीडा क्षेत्रातील सहभागाला प्रोत्साहन मिळणार आहे. २०२३ मध्ये अवघ्या ६७० धावपटूंपासून सुरू झालेल्या या उपक्रमात यंदा तब्बल ७ हजार २७० धावपटूंची नोंदणी झाली असून, ही वाढ बारामतीच्या क्रीडा संस्कृतीची साक्ष देणारी ठरत आहे.
२९ रोजी मुख्य मॅरेथॉनचा शुभारंभ
रविवार, (दि.२९) नोव्हेंबर हा मॅरेथॉनचा मुख्य दिवस असणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रेल्वे स्टेशन ग्राउंड, बारामती येथून स्पर्धांना सुरुवात होणार आहे. चार वेगवेगळ्या अंतरांच्या स्पर्धांचे आयोजन केले आहे. अनुभवी धावपटूंपासून नवोदित धावपटू, युवक-युवती, कुटुंबीय आणि फिटनेसप्रेमी नागरिकांपर्यंत सर्वांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. त्यामुळे चारही प्रकारच्या स्पर्धांमधून बारामतीच्या रस्त्यांवर धावण्याचा उत्साह पाहायला मिळणार आहे. १० लाखांची पारितोषिके; शाळा-महाविद्यालयांचाही विशेष सन्मान
मनोरंजनाची मेजवानी
मॅरेथॉन हा केवळ धावण्याचा कार्यक्रम न राहता संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी अनुभव ठरावा, या उद्देशाने दोन दिवस विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये विविध गेम्स, म्युझिक शो, फूड स्टॉल्स, मनोरंजनाचे विशेष कार्यक्रम असणार आहेत. त्यामुळे क्रीडा, खरेदी, खाद्यसंस्कृती आणि मनोरंजनाचा एकत्रित अनुभव बारामतीकरांना घेता येणार आहे.
मॅरेथॉनचे महत्त्वाचे आकर्षण
७,२७० नोंदणीकृत धावपटू
१० लाख. एकूण पारितोषिके
३०. स्पोर्ट्स एक्स्पो स्टॉल्स
४ मॅरेथॉनचे प्रकार





