प्रभात वृत्तसेवा सोमेश्वरनगर ( विजय लकडे ) – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. “मिनी विधानसभा” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत निंबूत–कांबळेश्वर गट हा बारामती तालुक्यातील सर्वाधिक चर्चेचा गट ठरत आहे. बागायती पट्ट्यात येणाऱ्या या गटात अनेक दिग्गज पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली असून आरक्षण ‘सर्वसाधारण’ लागल्याने राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. अनेक स्थानिक नेते आपल्या समर्थकांसह पक्षश्रेष्ठींकडे धाव घेत असून “मीच योग्य उमेदवार” असा दावा करीत आहेत. गाव पातळीवरील गटबांधणी, सोशल मीडिया मोहिमा आणि कार्यकर्त्यांच्या बैठका यामुळे गटात निवडणुकीचे वातावरण रंगले आहे. अजित पवार यांच्या सोमेश्वर कारखान्यावरील गव्हाण पूजन आणि निंबूत येथील विकास कामांच्या उद्घाटनावेळी या गटातील अनेक नेते उपस्थित होते. त्यावेळी विविध गावांतील पुढाऱ्यांनी विकासकामांच्या मागण्या सादर करत आपली राजकीय ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला. गटात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट), भाजप, राष्ट्रीय समाज पक्ष आणि बहुजन समाज पार्टी अशी चुरस पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र या गटात येत असल्याने, तसेच विविध गावच्या ग्रामपंचायत तसेच संस्थेवर अजित पवार गटाचे वर्चस्व जाणवते. त्यामुळे इच्छुकांची गर्दी याच गटाकडे जास्त आहे.तथापि, उमेदवारी न मिळाल्यास नाराज गट कोणती भूमिका घेतो, हे आगामी निवडणुकीतील सर्वात मोठे समीकरण ठरणार आहे. शरद पवार गट आणि भाजप काय रणनीती आखतात, हेही गटाच्या भवितव्यावर निर्णायक ठरणार आहे. जिल्हा परिषदेचा उमेदवार कोण यानंतर निंबूत पंचायत समिती (सर्वसाधारण) व कांबळेश्वर पंचायत समितीचा (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव) उमेदवार ठरणार असल्याच्या चर्चा देखील या निमित्ताने होत आहेत. मात्र, दोन्ही पंचायत समिती गणासाठी देखील उमेदवारीसाठी आचारसंहिंतेनंतर मोठी चुरस पाहावयास मिळणार आहे. इच्छुकांचे देव पाण्यात.. राजकीय रंग चढलेल्या निंबूत–कांबळेश्वर गटात आता प्रत्येक वळणावर नवी गणिते, नवे गट–तट तयार होत आहेत. पुढे कोण ‘किल्ला’ जिंकतो आणि कोणाचे “देव पाण्यात” जाते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. विविध विकासकामाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार निंबूतमध्ये आले असता शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी संपूर्ण बारामती तालुक्यात विकासाची गंगा तुम्ही आणली असून नव्या नेतृत्वाला राजकीय प्रवाहात आणण्यासाठी दादा तुम्ही जय पवार किंवा पार्थ पवार यांना निंबूत- कांबळेश्वर जिल्हा परिषद गटातून उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली. “निंबूत काबळेश्वर जिल्हा परिषद गटातून युवा नेते पार्थ पवार किंवा जय पवार यांना उमेदवारी द्या.” – सतीश काकडे. अध्यक्ष शेतकरी कृती समिती.