Baramati Plane Crash: बारामती येथे बुधवारी सकाळी झालेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्रासह देश हादरून गेला. या दुर्घटनेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विमानातील आणखी चार जणांचा मृत्यू झाला. या अपघातात प्राण गमावलेल्यांमध्ये फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी हिचाही समावेश होता. तिच्या निधनामुळे जौनपूर आणि मुंबईतील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील केरकत तहसीलमधील भैंसा गावची रहिवासी असलेली पिंकी माळी ही विमानसेविका म्हणून कार्यरत होती. अपघाताची बातमी समजताच तिच्या कुटुंबीयांना जबर धक्का बसला. विशेषतः तिची आजी ही बातमी ऐकताच अक्षरशः कोलमडून पडली. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी अश्रूंनी डोळे भरून म्हणाल्या, “माझी पिंकी गेली… आता ती परत येणार नाही…” पिंकीचे काका चंद्रभूषण माळी यांनी सांगितले की, पिंकी अत्यंत हुशार आणि मेहनती मुलगी होती. अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच ती घरी येऊन गेली होती. तिचं शिक्षण मुंबईत झालं असून, लहानपणापासूनच तिला काहीतरी मोठं करण्याची जिद्द होती. Pinky Mali दरम्यान, पिंकीच्या वडिलांनी सांगितले की मंगळवारीच त्यांचं मुलीशी फोनवर बोलणं झालं होतं. “उद्या मी अजित दादांसोबत बारामतीला जाणार आहे आणि तिथून नांदेडला जाईन,” असं पिंकीने सांगितलं होतं. मात्र ते संभाषण शेवटचं ठरेल, याची कल्पनाही नव्हती, असं सांगताना त्यांचा आवाज भरून आला. संघर्ष आणि मेहनतीने घडलेलं आयुष्य पिंकी माळीचं आयुष्य संघर्षाने भरलेलं होतं. तिचे वडील शिवकुमार माळी हे पूर्वी दिल्ली विमानतळावर काम करत होते. एका दुर्दैवी घटनेनंतर त्यांना नोकरी गमवावी लागली आणि त्यानंतर ते राजकारणात सक्रिय झाले. वडिलांच्या मार्गदर्शनामुळे पिंकीने मॉडेलिंगचा पर्याय सोडून एव्हिएशन क्षेत्रात करिअर घडवलं. कठोर परिश्रमाच्या जोरावर तिने फ्लाइट अटेंडंट म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली होती. अपघाताच्या आदल्या रात्रीही तिने घरच्यांशी फोनवर बोलून आपल्या प्रवासाची माहिती दिली होती. मात्र त्याच विमानाचा अपघात होईल आणि तिचा जीव जाईल, याची कोणालाही कल्पना नव्हती. या भीषण अपघाताने अजित पवार यांच्यासह पिंकी माळीचही कुटुंब उद्ध्वस्त झाल असून, त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे.