Baramati Plan Crash : पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात पुन्हा एकदा विमान दुर्घटनेची घटना घडली आहे. बारामतीतील गोजुबावी गावाच्या हद्दीत आज सकाळी प्रशिक्षणासाठी वापरलं जाणारं एक विमान उसाच्या शेतात कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ‘रेड बर्ड’ कंपनीचं प्रशिक्षण विमान आज सकाळी नियमित प्रशिक्षणासाठी उड्डाण करत होतं. सकाळी सुमारे ८:४० वाजण्याच्या सुमारास गोजुबावी गावाच्या उत्तरेकडे, गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असताना विमानाच्या इंजिनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. हवेतच विमानाचा आवाज बंद झाल्यानंतर वैमानिकाने प्रसंगावधान राखत लोकवस्तीपासून दूर असलेल्या उसाच्या शेतात इमर्जन्सी लँडिंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, लँडिंगदरम्यान विमान दुर्घटनाग्रस्त झालं. विमान उसाच्या शेतात कोसळल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत प्रशिक्षण घेत असलेला शिकाऊ वैमानिक सुरक्षित असून, अपघातानंतर तो प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत असल्याचं सांगितलं जात आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. त्यानंतर बारामती पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत तपासाला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, ज्या गोजुबावी परिसरात हा अपघात झाला, त्याच भागात यापूर्वी अजित पवार यांच्या विमानाचाही अपघात झाला होता. त्यामुळे या परिसरात वारंवार घडणाऱ्या विमान दुर्घटनांमुळे स्थानिकांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे. ही या भागातील तिसरी विमान दुर्घटना असल्याची माहिती समोर येत आहे. प्राथमिक तपासात विमानाचं इंजिन हवेतच बंद पडल्यामुळे इमर्जन्सी लँडिंग करावं लागल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, नेमका तांत्रिक बिघाड कशामुळे झाला, याचा अधिक तपास नागरी विमान वाहतूक विभागाकडून केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. हेही वाचा : Gold-Silver Price Today: आयात शुल्काच्या निर्णयामुळे सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ ; १० ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागणार?, वाचा