Pawar Family Diwali Padwa 2024 : पक्ष फुटी नंतर पवार कुटुंबात देखील फूट पडल्यानंतर यंदाचा दिवाळी पाडवा पवार कुटुंबीय एकत्र साजरा करणार का याकडे लक्ष लागले असतानाच यंदा मात्र राजकीय विभाजनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार हे गोविंदबाग या निवासस्थानी तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या काटेवाडी येथील निवासस्थानी शनिवारी (ता. 2) लोकांशी संवाद साधणार आहेत.
विधानसभा निवडणूकीच्या प्रचारानिमित्त अजित पवार शुक्रवारी (ता. 1) बारामती तालुक्याचा दौरा करत आहेत. या दौऱ्यानिमित्त झारगडवाडी येथे ग्रामस्थांशी संवाद साधताना त्यांनी दिवाळीच्या पाडव्यानिमित्त आपण काटेवाडी येथील निवासस्थानी कार्यकर्त्यांना भेटणार असल्याचे नमूद केले. सहयोग येथील जागा कमी पडत असल्याने काटेवाडीत भेटण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
दरवर्षी दिवाळीच्या पाडव्यानिमित्त पवार कुटुंबिय एकत्रितरित्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी राज्यभरातून येणाऱ्या कार्यकर्ते व नागरिकांना भेटतात. गतवर्षी अजित पवार यांनी भाजपसोबत जात सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरुध्द सुनेत्रा पवार यांनी लोकसभेची निवडणूक लढविली. त्या नंतर पवार कुटुंबातील दरी वाढतच गेली.
या पार्श्वभूमीवर यंदाच्या दिवाळी पाडव्याबाबत राज्यभरातील दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांत उत्सुकता होती. आज अजित पवार यांनी काटेवाडीत आपण कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह नागरिकांना भेटणार असल्याचे स्पष्ट केल्याने यंदा गोविंदबाग व काटेवाडी अशा दोन ठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी होणार आहे.सुनिल तटकरे व इतर काही मान्यवरांचे फोन आले होते, त्यामुळे काटेवाडीत मी कार्यकर्त्यांना भेटायचा निर्णय घेतल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार यांच्यासह इतर मान्यवर गोविंदबागेत सकाळपासूनच लोकांना भेटणार आहेत.