प्रभात वृत्तसेवा वडगाव निंबाळकर – गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्यापासून ते वापराच्या पाण्यापर्यंत ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. परंतु यावर तोंडी व लेखी तक्रार ग्रामपंचायत प्रशासन, बारामती पंचायत समितीच्या प्रशासनला करूनही कुठल्याही प्रकारची कार्यवाही करताना दिसत नाही. त्यामुळे गावकऱ्यांतून संतापाची प्रतिक्रिया उमटत आहे. थोपटेवाडी गावामध्ये काही भूमिहीन कुटुंब राहत असून यांना पाण्याचा कुठलाही स्रोत कायमस्वरूपी नाही. या कुटुंबांना ग्रामपंचायत मार्फत जे पाणीपुरवठा होतो त्याच पाण्यावर गुरेढोरे व वापरण्यासाठी पाणी असते. हे पाणी एक दिवसाआड येत असून काही वेळेस दोन, तीन दिवस देखील पाणी येत नाही. परंतु आज स्थितीला दहा ते बारा दिवसांपासून कुठलेही प्रकारचा पाणीपुरवठा केला गेला नाही. आम्ही जगायचे कसे, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.एका ग्रामस्थांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यास आम्ही वेळेवर पाणीपट्टी भरूनही पाणी येत नाही, तर आम्ही भरलेली पाणीपट्टी माघारी द्या, असे म्हटले असता, त्या कर्मचाऱ्यांनी कोणाला तक्रार करायचे आहे. त्यांना करा मी पाणी सोडणार नाही जा काय करायचे आहे ते करा असे म्हटला.तरी येत्या एक ते दोन दिवसात पिण्याचा पाण्याचा प्रश्न ग्रामपंचायतीमार्फत न सुटल्यास ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत ग्रामस्थांच्या वतीने पत्र पंचायत समिती प्रशासनाला दिले आहे.