Baramati News : पालखी महामार्गाच्या गटार कामात मोठा घोटाळा? लोखंडी ऐवजी प्लास्टिकचे गज वापरण्याचा प्रकार उघड

काटेवाडी (ता. बारामती) | श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या गटार लाईनच्या कामात मोठा गैरप्रकार समोर आला आहे. या गटारासाठी लोखंडी गज (सळई) वापरण्याऐवजी प्लास्टिकचे गज वापरण्यात येत असून, त्यांना वरून काळा रंग देऊन त्यांचा बनावटी लोखंडी गज असल्याचा आभास निर्माण केला जात आहे. काटेवाडी येथील नागरिक अजित देवकाते व संतोष देवकाते यांनी हा प्रकार उघडकीस आणला असून, त्यांनी या कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून महामार्गाचे काम ठप्प असले तरी साईड गटारचे काम सुरू आहे. पूर्वीच्या टप्प्यात लोखंडी गजांचा वापर करण्यात आला होता, मात्र आता प्लास्टिकचे गज वापरण्यात येत आहेत. हे गज जरा जोरात दाबले किंवा दुमडले तर तुकडे होत असून, त्यातून प्लास्टिकचा कचरा बाहेर येत आहे. त्यामुळे हा प्रकल्प दर्जाहीन होत असून, भविष्यात मोठा अपघात किंवा नुकसान होण्याची शक्यता आहे.
ठेकेदाराचा पैसे वाचवण्याचा डाव?
या कामात प्लास्टिकचे गज वापरण्यामागे ठेकेदाराचा मोठा स्वार्थ असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. लोखंडी गजांच्या तुलनेत प्लास्टिकचे गज स्वस्त असतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर खर्च वाचवण्यासाठी हा बदल केला गेला आहे का? जर प्लास्टिकचे गज अधिक चांगले असते, तर आधीच्या टप्प्यात लोखंडी गज का वापरण्यात आले? असा सवालही ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
सरकारने कोणती परवानगी दिली?
जर सरकारने ठेकेदाराला प्लास्टिकचे गज वापरण्याची परवानगी दिली असेल, तर ते किती सुरक्षित आहेत आणि हे निर्णय कशाच्या आधारे घेतले, याचा खुलासा करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच, हा प्रकार सरकारी यंत्रणांच्या निदर्शनास येऊनही जर ठेकेदारावर कारवाई होत नसेल, तर हा एक प्रकारचा घोटाळा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
निकृष्ट दर्जाच्या रस्त्याचीही तक्रार
याच महामार्गाच्या कामात अनेक त्रुटी असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणले आहे. महामार्गाचे काम सध्या ठप्प असून, जे काम झाले आहे तेही निकृष्ट दर्जाचे असल्याचे आरोप ग्रामस्थ करत आहेत. महामार्ग लवकर पूर्ण करण्याची आणि दर्जेदार कामाची मागणीही करण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकाराची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काटेवाडीतील ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे. शासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घेतली नाही, तर याविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.





