प्रभात वृत्तसेवा पुणे – राज्य परिवहन महामंडळाकडून ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर एसटी बसस्थानक अभियान’ सुरू केले आहे. या अभियानातून राज्यातील सर्व विभागांतील बसस्थानकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच जाहीर केला असून, पुणे विभागातील बारामती, मोरगांव आणि इंदापूर स्थानकांनी बाजी मारली आहे. पुणे विभागातील ३१ बसस्थानकांपैकी केवळ तीन बसस्थानके (बारामती, मोरगांव आणि इंदापूर) उच्चांकी गुणाने तर दहा स्थानके विशेष प्राविण्याने पास झाले. सात स्थानकांना ६० पेक्षा अधिक गुण मिळाले. मात्र, चार स्थानके सर्वेक्षणात नापास झाली असून, पाच स्थानके काठावर पास झाली. त्यामध्ये स्मार्ट पुण्यातील स्वारगेट स्थानकाचा समावेश आहे. दरम्यान, दोन स्थानकांची कामे सुरू असल्याने त्यांचे गुणांक झाले नाही. गेल्या दोन वर्षांपासून स्वच्छ, सुंदर एसटी बसस्थानक हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातून प्रथम, द्वितीय, तृतीय अशी निवड करण्यात येणार आहे. त्यामध्ये उत्कृष्ट बसस्थानकांना रोख बक्षीस देऊन गौरवण्यात येते. संपूर्ण वर्षभरात होणाऱ्या सर्वेक्षणात एकूण सहा फेऱ्यांच्या गुणांच्या आधारे अंतिम विजेत्या बसस्थानकांची निवड केली जाते. विभागातील स्वच्छ, सुंदर एसटी बसस्थानक या सर्वेक्षण ‘अ’ गटामध्ये बारामती आगाराला सर्वांत जास्त ९७ गुण मिळाले आहेत. त्यानंतर ‘ब’ गटामध्ये इंदापूर ८२ आणि ‘क’ गटामध्ये मोरगाव बसस्थानकाला ८१ गुण मिळाले आहेत. त्यानुसार यंदा बारामती आगार बाजी मारणार असे दिसून येते. या सर्वेक्षणात स्थानकाची देखभाल व दुरुस्ती, शौचालय आणि स्थानकावरील स्वच्छता, एका दिवसातील प्रवासी संख्या, बसची देखभाल या बाबींचे निरीक्षण करूण गुण दिले जातात. त्यामध्ये पाैड, आळेफाटा, जुन्नर (नवीन), वेल्हा बसस्थानकांना ५० पेक्षा कमी गुण मिळाल्याने सर्वेक्षणात नापास झाली. पुणे विभागातील एसटी बसस्थानकांना प्राप्त गुण.. -९० पेक्षा अधिक गुण – बारामती -८० पेक्षा अधिक गुण – मोरगांव आणि इंदापूर -70 पेक्षा अधिक गुण (उत्तम) – शिवाजीनगर, राजगुरूनगर, भिमाशंकर, निरा, नारायणगाव, सासवड, भोर, दौंड, पिंपरी-चिंचवड -60 पेक्षा अधिक गुण (चांगले) – पुणे रेल्वे स्टेशन, भिगवण, सुपा, ओतूर, तळेगांव, लोणावळा, शिक्रापूर -50 पेक्षा अधिक गुण (समाधानकारक) – स्वारगेट, चाकण, घोडेगांव, मंचर, शिरूर -50 पेक्षा कमी गुण (असमाधानकारक) – वेल्हा, जुन्नर (नवीन), आळेफाट, पौड