बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीपथावर असलेल्या ‘बारामती दूध संघा’चे नामांतर करण्याचा ऐतिहासिक निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. यापुढे हा संघ ‘सहकारमहर्षी अजितदादा पवार सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, बारामती’ या नावाने ओळखला जाणार आहे. संघाचे चेअरमन संजय कोकरे आणि व्हाईस चेअरमन दत्तात्रय वावगे यांनी या निर्णयाची अधिकृत घोषणा केली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याची आणि सहकार क्षेत्रातील योगदानाची आठवण स्मरणात राहावी, या उद्देशाने हे नामकरण करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावेळी संघाचे सर्व संचालक, व्यवस्थापकीय संचालक डॉ. योगेश राणे, उपमहाव्यवस्थापक (वित्त) अमोल चव्हाण आदी उपस्थित होते. संघाचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ नंदन या ब्रँड नावाने बाजारपेठेत प्रसिद्ध आहेत. मुंबई, पुणे, लोणावळा, अहिल्यानगर, संभाजीनगर, सोलापूर, रोहा आणि महाड यांसारख्या शहरांमध्ये नंदन दुधाची मोठी विक्री होते. नामांकित हॉटेल्स, कॉर्पोरेट ऑफिसेस आणि हॉस्पिटल्समध्येही या उत्पादनांना विशेष पसंती मिळत आहे. सध्या संघामार्फत श्रीखंड, आम्रखंड, पनीर, तूप, बासुंदी, पेढा, लस्सी आणि कलाकंद यांसारख्या उच्च दर्जाच्या पदार्थांचे उत्पादन घेतले जात आहे. संघाच्या दूध उत्पादक शेतक-यांसाठी योग्य व वाजवी किंमतीत नंदन सुप्रिम, नंदन गोल्ड, नंदन गोल्ड प्लस, नंदन सिलव्हर, नंदन काफस्टार्टर, नंदन गर्भसत्व इत्यादी पशुखाद्य तसेच नंदन मिल्कमीन (मिनरल मिक्चर) इत्यादी प्रकारचे दर्जेदार उत्पादने विक्रीसाठी बाजारात आणली, असून बारामती तालुक्यासह, दौंड, पुरंदर, खंडाळा, फलटण, माण, श्रीगोंदा, इंदापूर, करमाळा, टेंभूर्णी, सोलापूर इत्यादी ठिकाणी विक्री केली जाते. शेतकरी हिताचे विविध उपक्रम संघामार्फत सर्व प्राथमिक दूध संस्थांना मोफत पशुवैद्यकीय सेवा, आर्युवेदिक उपचार पध्दत, मुरघास प्रशिक्षण दिले जाते. तसेच दुध उत्पादकांना डेअरी साहित्य विभागामार्फत चाफकटर, मिल्कींग मशिन, मुरघास बॅग व मका बियाणे इत्यादीची अनुदानावर विक्री केली जाते.