प्रभात वृत्तसेवा बारामती – बारामती शहरातील नागरिकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणार आहे. मुलभूत सुविधा देण्यासोबतच बारामतीचा नावलौकीक वाढविण्यासाठी माझ्यासह सर्व माझे नगरसेवक मनापासून काम करणार आहे. महिला सबलीकरण, युवकांचा सहभाग, त्यांचा उत्कर्ष, लोकसहभाग, दीर्घकालीन धोरण राबविणार असल्याची अशी ग्वाही नवनिर्वाचित नगराध्यक्ष सचिन सातव यांनी दिली. बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचा कार्यभार सचिन सातव यांनी (दि. १) रोजी स्वीकारला. त्यानंतर नगराध्यक्ष सातव यांनी दैनिक प्रभातशी बोलताना आगामी पाच वर्षांतील बारामती शहरातील विकासाचे व्हिजन स्पष्ट केले.युवकांचा सहभाग, प्रत्येक प्रभागात भेटी देत महिलांच्या अडचणी सोडविणार, मानवी हस्तक्षेप कमी करण्यासाठी एआयची मदतही यावर भर देत त्यांनी आपल्या पाच वर्षांचा रोड मॅप सादर केला. सचिन सातव म्हणाले, बारामतीच्या जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, तो माझ्यासाठी सन्मान आहेच, सोबतच मोठी जबाबदारी आहे. बारामतीला देशातील सर्वात सुंदर शहर करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुनेत्रा पवार यांचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही सर्व नगरसेवक जिवाचे रान करणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संधी दिली आहे त्याचे सोने करुन दाखविण्यासाठी पाच वर्ष झटून काम करणार आहे. मुलभूत प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचे सांगून सातव म्हणाले, नागरिकांच्या मुलभूत प्रश्नांना आमचे सर्वाधिक प्राधान्य असेल. स्वच्छता, पुरेसे पिण्याचे पाणी, खड्डेमुक्त रस्ते, नव्याने होत असलेल्या उपनगरात भुयारी गटार योजना, घनकचरा व्यवस्थापन, पार्किंगची समस्या दूर करण्यासह आरोग्य व शिक्षण या मूलभूत सुविधांवर भर देणार आहे. डिजिटल सेवा, पारदर्शक प्रशासन, जलद निर्णयप्रक्रियेला आमचे प्राधान्य राहणार आहे. बारामतीत सर्वांगीण विकास करताना समाजाच्या सर्वच घटकांना सोबत घेऊन जाण्याचा व शहरातील सर्वच प्रभागात तेथील प्राधान्यक्रम निश्चित करुन त्यानुसार विविध विकासकामे आम्ही हाती घेणार आहोत. समतोल विकास व्हावा हे अजित पवार यांचेच स्वप्न असून बहुसंख्य नागरिकांना फायदा होतील अशा योजना प्राधान्याने राबविल्या जातील. बारामती शहर झोपडपट्टीमुक्त करण्याचे अजित पवार यांचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील राहणार आहे. शहराच्या विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून सर्वाना सोबत घेऊन काम करणे, हाच माझा दृष्टिकोन आहे. निवडणूक संपल्यानंतर आता राजकीय भूमिका दूर ठेवून बारामतीच्या सर्वागिण विकासासाठी सर्वच घटकांना सोबत घेऊन काम करण्याचीच आमची भूमिका असेल, अजितदादा पवार यांच्या विकासाच्या मुद्यावरच आम्ही पाच वर्षे काम करत राहणार आहोत.