पुणे : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, जिल्ह्यातील बारामती, फुरसुंगी उरुळी देवाची या दोन संपूर्ण नगरपरिषदांची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. तसेच, तळेगाव दाभाडे, लोणावळा, दौंड आणि सासवड नगरपरिषदेतील सदस्यपदाच्या काही जागांसाठीचे मतदान देखील पुढे ढकलण्यात आले आहे. त्यानुसार या स्थगित केलेल्या नगरपरिषदांसाठी आता २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे. बारामती नगरपरिषदेच्या जागा क्र. २ (अ), ८ (ब), ११ (व), १३ (ब), १५ (ब), १७(अ)) व १९ (ब) साठीचे न्यायालयाचे निकाल देखील दि. २२ नोव्हेंबर २०२५ रोजी नंतर लागलेले आहेत व फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषदेच्या जागा क्र. १३ (ब) करीता निकाल दि. २२ नोव्हेंबर २०२५ रोजी नंतरच पारित करण्यात आला आहे. तरी आयोगाच्या आदेशात नमूद केल्यानुसार सदर दोन्ही नगरपरिषदांच्या अध्यक्ष पदाचा समावेश असल्याने त्या बारामती व फुरसुंगी उरुळी देवाची या दोन्ही संपूर्ण नगरपरिषदेची निवडणूक स्थगित करण्यात येत असून बारामती व फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी व सदस्यपदांसाठीची सार्वत्रिक निवडणूक़ीसाठी मतदान दि.२० डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात येणार आहे. तसेच तळेगाव दाभाडे, लोणावळा, दौंड व सासवड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने सदस्य पदासंदर्भात देखील जिल्हा न्यायालयात अपील दाखल झाले होते. सदर अपीलावर देखील न्यायालयाने दि. २२ नोव्हेंबर २०२५ नंतर निकाल पारीत केलेला असल्यामुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या जागा क्र. २ (अ), ७ (अ), ७ (ब), ८ (अ), ८ (ब) व १० (ब), लोणावळा नगरपरिषदेच्या जागा क्र.५ (ब) व १० (अ) व दौंड नगरपरिषदेच्या जागा क्र.९ (अ) व सासवड नगरपरिषदेच्या जागा क्र. ११ (अ) या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी देखील आता दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान घेण्यात येणार आहे. वर नमुद नगरपरिषदांसाठी अध्यक्ष व सदस्य पदासाठी नव्याने कोणत्याही उमेदवारास नामनिर्देशन दाखल करता येणार नाही. फक्त ज्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्र मागे घ्यावयाचे असल्यास, नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक १० डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ०३.०० वाजेपर्यत आहे, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले आहे. बारामती व फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासहित सर्व सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तसेच, तळेगाव दाभाडे, लोणावळा व दौंड नगरपरिषदेच्या उक्त नमुद जागेच्या सदस्यपदाच्या निवडणूकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या सुधारीत वेळापत्रकानुसार निवडणूक कार्यक्रम स्वंतत्रपणे वृत्तपत्रात प्रसिध्द करण्यात येईल. तसेच, त्यास संबंधित क्षेत्रात यथोचित प्रसिध्दी देण्यात येईल याची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.