प्रभात वृत्तसेवा सोमेश्वरनगर – वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या दोन अल्पवयीन मुलांच्या बेपत्ता प्रकरणाचा सुखद शेवट झाला असून, पोलिसांनी दोन्ही मुले भीमाशंकर (ता. खेड) येथून सुखरूप अवस्थेत ताब्यात घेतली आहेत.बेपत्ता मुलांमध्ये शुभम गणेश जाधव (वय 16) व पियुष विलास मोहिते (वय 15, दोन्ही रा. मुट़ीं, ता. बारामती) यांचा समावेश होता. अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून फूस लावून या मुलांना पळवून नेल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करताना तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दीपक वारुळे यांनी तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय बातमीदारांच्या माहितीद्वारे तपासाला गती दिली. अखेर पोलिसांना दोन्ही मुले भीमाशंकर येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आणि त्यानुसार कारवाई करत त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर मुलांचे पालक गणेश दामू जाधव व विलास कुंडलिक मोहिते यांना करंजेपूल पोलीस दूरक्षेत्र येथे बोलावून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर दोन्ही मुलांना पालकांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले. मुलांची सुखरूप सुटका झाल्याने नातेवाईकांसह नागरिकांनी वडगाव निंबाळकर पोलिसांचे आभार व्यक्त केले.ही उल्लेखनीय कामगिरी संदीपसिंह गिल्ल (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण), गणेश बिरादार (अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग) व सुदर्शन राठोड (उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे, पोलीस उपनिरीक्षक दीपक वारुळे, पोलीस हवालदार रमेश नागटिळक व अमोल भोसले यांच्या पथकाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.