प्रभात वृत्तसेवा बारामती – नातेसंबंधांपेक्षा कायदा मोठा आहे, हे पुन्हा एकदा बारामती न्यायालयाने ठणकावून सांगितले आहे. सख्ख्या भावांमधील आर्थिक व्यवहारातून उद्भवलेल्या चेक बाउन्स प्रकरणात न्यायालयाने कठोर भूमिका घेत आरोपी मोठ्या भावास दोषी ठरवत सहा महिन्यांची साधी कैद तसेच तक्रारदारास दहा लाख रुपयांची भरपाई देण्याचा स्पष्ट आदेश दिला आहे.एकत्र कुटुंब, एकत्र व्यवसाय आणि आपुलकीचा विश्वास. पण पैशाच्या व्यवहारात फसवणूक झाली तर रक्ताच्या नात्यालाही कायदा ओळखत नाही, हे या निकालातून अधोरेखित झाले आहे.याप्रकरणात तक्रारदार व आरोपी हे सख्खे भाऊ असून, देऊळगाव गाड़ा (ता. बारामती) येथील जगदंबा नर्सरी या व्यवसायात ते एकत्र सहभागी होते. व्यवसायाच्या ओघात आरोपीने दिलेला धनादेश बँकेत सादर केल्यानंतर निधीअभावी न वटल्याने तक्रारदाराचे आर्थिक नुकसान झाले. शेवटी न्याय मिळवण्यासाठी तक्रारदाराने निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायदा, 1881 च्या कलम 138 अंतर्गत न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.फौजदारी खटला क्रमांक 361/2017 मध्ये अतिरिक्त मुख्य न्यायिक दंडाधिकारी, बारामती यांनी सर्व पुरावे, कागदपत्रे व दोन्ही बाजूंचे युक्तिवाद बारकाईने तपासून आरोपी धनाजी बापूराव लडकत यांना दोषी ठरवले. न्यायालयाने स्पष्ट शब्दांत नमूद केले की, धनादेश हा कायद्याने देय असलेल्या रकमेच्या फेडीसाठीच दिला गेला होता. तो न वटल्याने कलम 138 अंतर्गत गुन्हा सिद्ध होतो.या प्रकरणात फिर्यादी सोनबा बापूराव लडकत (रा. शेरेचीवाडी, बारामती) यांची बाजू प्रभावीपणे ॲड. एस. बी. शिंदे, बारामती यांनी मांडली. त्यांना ॲड. रेवणनाथ सोनवणे यांचे सहकार्य लाभले.