Baramati By-Election – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी गुरूवार (दि.23) रोजी मतदान होत आहे. काँग्रेसने उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ही पोटनिवडणूक राज्यात चर्चेत आली होती. आरोप- प्रत्यारोपाची राळ उठल्यानंतर पुन्हा अर्ज माघारी घेतल्यानंतर पोटनिवडणुकीचे रण शमले होते. दरम्यान, उन्हाची तीव्रता असल्याने मतदानादिवशी मतदारांना केंद्रापर्यंत आणण्याचे आव्हान महायुतीपुढे आहे. बारामती पोटनिवडणुकीत महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. त्यांना महाविकास आघाडी, सामाजिक संघटना, अन्य पक्षांनी पाठिंबा दिला आहे. अर्ज माघारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना (उबाठा), संपूर्ण पवार कुटुंबीय निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय झाले होते. महायुतीकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सांगता सभा पार पडली आहे. अजितदादांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक भावनिक झाली असून गावांगावांतील स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते जोमाने काम करीत आहेत. खासदार पार्थ पवार, जय पवार यांनी भेटीगाठीवर भर देत मतदारांशी संवाद साधला आहे. मतदारसंघात एकूण 3 लाख 84 हजार 579 मतदार असून, त्यामध्ये 1 लाख 93 हजार 871 पुरुष, 1 लाख 90 हजार 684 महिला आणि 24 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. या मतदारांसाठी 478 मतदान केंद्रांची व्यवस्था केली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांनी दिली आहे. निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे पालन सुनिश्चित करण्यासाठी एकूण 96 कर्मचार्यांची नियुक्ती केली आहे. पोटनिवडणुकीची मतमोजणी (दि.4) मे रोजी बारामती महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे गोदाम, एमआयडीसीत होणार आहे. 165 वाहनांची व्यवस्था 478 ईव्हीएम, 956 बॅलेट युनिट्स आणि 478 व्हीव्हीपॅट यंत्रे मतदान केंद्रांवर पाठवणार आहेत. 60 ईव्हीएम व व्हीव्हीपॅट, 120 बॅलेट युनिट्स राखीव आहेत. निवडणूक कामकाजासाठी 165 वाहनांची व्यवस्था केली आहे. क्षेत्रीय अधिकार्यांसाठी 60 वाहने, ईव्हीएम मशीन व साहित्य वाहतुकीसाठी 60 बंदिस्त मिनी टेम्पो आणि कर्मचार्यांच्या वाहतुकीसाठी 45 बसेसचा समावेश आहे.