Baramati By-Election : बारामतीची पोट निवडणूक बिनविरोध होणार नाही; ‘या’ बड्या नेत्याने थोपटले दंड
अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा जागेसाठी (Baramati By-Election) होणाऱ्या पोटनिवडणुकीत बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे.

Baramati By-Election : अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा जागेसाठी (Baramati By-Election) होणाऱ्या पोटनिवडणुकीत बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी स्पष्टपणे बारामतीत (Baramati By-Election) उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
निवडणूक आयोगाची घोषणा
निवडणूक आयोगाने बारामती (Baramati By-Election) आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. या दोन्ही जागांसाठी २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार असून, ४ मे २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे.
लक्ष्मण हाके यांची घोषणा
बारामती पोटनिवडणुकीबाबत बोलताना लक्ष्मण हाके यांनी म्हटले, “आम्ही बारामती विधानसभा पोटनिवडणूक लढणार आहोत. योग्य वेळी उमेदवार जाहीर करू. अनेक पक्ष आमच्या संपर्कात आहेत. यामध्ये काही राष्ट्रीय पक्ष देखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. काहीही झाले तरी आम्ही बारामतीची निवडणूक लढणार आहोत.” हाके यांनी पुढे सांगितले की, येत्या दोन दिवसांत उमेदवार कोण असेल हे जाहीर केले जाईल. त्यांनी अनेक पक्षांशी चर्चा सुरू असल्याचेही स्पष्ट केले.
लोकशाहीसाठी निवडणूक गरजेची – हाके
लक्ष्मण हाके यांनी याआधीच्या पोटनिवडणुकांचा संदर्भ देत म्हटले, “महाराष्ट्रात यापूर्वी अनेकदा एखाद्या नेत्याच्या निधनानंतर पोटनिवडणुका झाल्या आहेत. रमेश वांजळे यांच्या निधनानंतर भाजपाने त्या जागी उमेदवार दिला आणि निवडणूक जिंकली.
पिंपरी-चिंचवडचे नेते लक्ष्मण जगताप यांच्या अकाली निधनानंतर अजित पवार यांनी विरोधक उभे केले होते. लोकशाही टिकवायची असेल तर निवडणुका व्हायलाच हव्यात. निधनाच्या निमित्ताने निवडणुका बिनविरोध करण्याचा प्रयत्न लोकशाहीसाठी घातक आहे.”
सुनेत्रा पवार यांना विधान परिषदेवर पाठवावे – हाके
लक्ष्मण हाके यांनी अजित पवार कुटुंबीयांवर टीका करताना म्हटले, “दादांच्या सहानुभूतीवर सुनेत्रा पवार यांना तिसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री पद देण्यात आले. हजारो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप असलेल्या पार्थ पवार यांना बिनविरोध राज्यसभेवर पाठवण्यात आले.
शरद पवार यांनाही बिनविरोध राज्यसभेवर पाठवले गेले. आता सुनेत्रा पवार यांना बिनविरोध विधान परिषदेवर पाठवावे आणि भाजपा व सत्ताधारी पक्षांनी एक कार्यकर्ता उभा करावा. आप, बसपा, काँग्रेससह सत्तेतील पक्ष डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट आमच्याशी सहमत आहेत.”
ओबीसींचा मुद्दा आणि इशारा
आरक्षणाच्या मुद्द्यावर रस्त्यावर लढणारे कार्यकर्ते असल्याचे सांगत हाके म्हणाले, “आम्ही लोकशाहीत निवडणुकीला सामोरे जाऊ. शेवटी जनता ठरवेल की आमची मते योग्य आहेत की अयोग्य. बारामतीत ओबीसींनी मनावर घेतले तर पुढच्या पक्षाचे डिपॉझिट जप्त होऊ शकते.”
लक्ष्मण हाके यांच्या उमेदवारीमुळे बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे. येत्या दोन दिवसांत हाके यांचा उमेदवार जाहीर होणार असून, २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






