Baramati Election: राज्याच्या राजकारणात आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीमुळे नेहमीच चर्चेत राहणारे अभिजीत बिचुकले आता बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी बिचुकले यांनी शनिवारी (४ एप्रिल) आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे बारामतीची लढत आता अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. उमेदवारी अर्ज दाखल – कोणतीही निवडणूक असो, मग ती राष्ट्रपतीपदाची असो वा सरपंचपदाची. उमेदवारी अर्ज भरण्यात आघाडीवर असणाऱ्या बिचुकले यांनी बारामतीसाठी पूर्ण ताकदीनिशी उतरण्याचा निर्धार केला आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांनी लवकरच एक ‘राजकीय बॉम्ब’ टाकण्याचे संकेत दिले आहेत. आपण अपक्ष निवडणूक का लढवत आहोत आणि आपली नेमकी भूमिका काय, याचा उलगडा ते येत्या दोन-तीन दिवसांत पत्रकार परिषदेत करणार आहेत. बारामतीचे राजकीय चित्र – एकीकडे सत्ताधारी महायुतीने ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सुनेत्रा पवार यांच्या विरोधात कोणीही उमेदवार देऊ नये, अशी भूमिका मुख्यमंत्री आणि महायुतीच्या नेत्यांनी मांडली आहे. मात्र, दुसरीकडे महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्याच्या हालचाली वेगवान झाल्या असतानाच, बिचुकले यांनी शड्डू ठोकल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार असून निकाल 4 मे रोजी जाहीर होणार आहेत. आतापर्यंत बिचुकले यांच्यासह एकूण १७ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. हेही वाचा – देशाचे पुढचे पंतप्रधान राघव चड्ढा’; परिणीती चोप्राच्या पोस्टवर पतीची कमेंट, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सागर भिसे, सतिश कदम, रघू घुटूकडे, त्रिशला कांबळे, गजानन गवळी यांच्यासह १२ हून अधिक जणांनी आपले अर्ज सादर केले आहेत. कोण आहेत अभिजीत बिचुकले? साताऱ्यातील ‘बिचुकले’ गावचे रहिवासी असलेले अभिजीत बिचुकले स्वतःला शिवछत्रपतींचे वैचारिक वारसदार मानतात. त्यांचे शिक्षण कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून झाले असून, २००१ मध्ये त्यांनी साताऱ्यातील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयातून इंग्रजी विषयात ऑनर्ससह पदवी मिळवली आहे. साताऱ्यात थेट उदयनराजे भोसले यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे बिचुकले, देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून असतात. मराठी बिग बाॅसच्या शोमधील सहभागामुळे ते देशभर प्रसिद्ध झाले. बारामतीच्या या हायव्होल्टेज पोटनिवडणुकीत बिचुकले काय चमत्कार घडवतात आणि त्यांच्या ‘राजकीय बॉम्ब’मध्ये नेमके काय असणार, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान महाविकास आघाडीचा उमेदवार उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. असे संकेत काॅंग्रेस नेतृत्वाकडून देण्यात आले आहेत.