प्रभात वृत्तसेवा बारामती – देशातील सर्वात अत्याधुनिक व ग्रामीण जीवनाचा चेहरामोहरा बदलू शकणा-या विद्या प्रतिष्ठानच्या शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे उद्घाटन रविवारी (दि. २८) रोजी होत आहे. अदानी उद्योगसमूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या हस्ते, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे,खासदार सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत सकाळी दहा वाजता गदिमा सभागृहात हे उदघाटन होणार आहे. विद्या प्रतिष्ठाणचे उपाध्यक्ष अँड. ए. व्ही. प्रभुणे, खजिनदार युगेंद्र पवार, सचिव अँड. नीलिमा गुजर यांनी या बाबत माहिती दिली. बदलत्या काळाची पावले ओळखत आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचे शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावे या उद्देशाने शरद पवार यांच्या पुढाकारातून बारामतीत हे केंद्र सुरु होत आहे. या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये अत्याधुनिक एआय व डेटा सायन्स प्रयोगशाळा, प्रमाणपत्र व कौशल्यवर्धक अभ्यासक्रम, उद्योगतज्ज्ञांचे मार्गदर्शन, संशोधन व नवउद्योजकतेसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. एआय क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पाऊल शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स (AI) हे केंद्र कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, व्यवसाय विश्लेषण व नवोन्मेष या आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात विद्यार्थ्यांना, संशोधकांना व उद्योगजगताला एकत्र आणणारे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे. केंद्राची उद्दिष्टे -विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख एआय कौशल्ये विकसित करण्याची संधी. -संशोधन, नवोन्मेष व स्टार्ट-अप संस्कृतीला चालना. -उद्योग-संस्था सहकार्याद्वारे प्रत्यक्ष प्रकल्प व प्रशिक्षण. -ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करून देणे.