पुणे | फुल, फळांच्या बाजाराला बाप्पा पावला

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – गणपती बाप्पाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर शहर आणि उपनगरांतील बाजारपेठा गजबजल्या आहेत. लाडक्या गणरायाच्या नित्य पूजेसाठी हार लागत असल्याने घाऊकसह किरकोळ बाजारात फुलांना मागणी वाढली आहे.
त्यामुळे फुलांना चांगलाच भाव आला आहे. तर, प्रसादासाठी फळांचा वापर होत असल्याने फळांनाही चांगली मागणी असल्याचे चित्र शहरात आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डातील फुलबाजारात जिल्ह्यासह सोलापूर, वाई, सातारा आदी भागांतून झेंडूच्या फुलांची तर कर्नाटकातूनही “मारिगोल्ड’ प्रजातीच्या शेवंतीची सर्वाधिक आवक होत असते.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मार्केटयार्डातील फूलबाजारात सर्व प्रकारच्या फुलांची आवक वाढत आहे. मागणीही चांगली असल्याने गेल्या महिनाभरापासून पडलेले फुलांचे भाव वाढत आहेत.
आवकेच्या तुलनेत मागणी अधिक असल्याने झेंडू, शेवंतीचे भाव वीस ते तीस टक्के वाढले; तर गुलछडीचे भाव दुपटीने वाढले आहेत. गणेशोत्सव काळात फुलांचे भाव तेजीतच राहणार असल्याचे अखिल पुणे फुलबाजार आडते असोसिएशनचे अध्यक्ष अरूण वीर यांनी सांगितले.
याखेरीज, पूजेच्या वाट्यासाठी केळी, सफरचंद, पेरू, चिकू, सिताफळ आदी फळांना मोठी होत. त्यानंतर, प्रसादासाठी सफरचंद, केळी आदी फळांना मागणी टिकून राहिल.
देशासह परदेशातून सफरचंद तसेच पुणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात केळी बाजारात दाखल होत आहे. आवक जावक कायम असल्याने त्या सर्वांचे दर स्थिर असल्याचेही आडतदार युवराज काची यांनी सांगितले.
पुणे शहर व जिल्ह्यासह मुंबई, कोकण, ठाणे, पनवेल, दादर, काही प्रमाणात गोवा भागातील खरेदीदारांकडून फुलांची खरेदी होत आहे.
झेंडु, शेवंतीचे भाव चांगले वाढले असून गुलछडीचे भाव दुप्पट झाले होते. बाजारात ओली तसेच सुकी फुले दाखल होत आहेत. त्यामध्ये, सुक्या व दर्जेदार फुलांना चांगला भाव मिळत आहे. – सागर भोसले, समन्वयक, अखिल पुणे फुलबाजार अडते असोसिएशन.
फुलांचे प्रतिकिलोचे भाव (रुपयांत)
झेंडू : १०-१४०, गुलछडी : १०००-१५००, अॅस्टर : जुडी ३०-४०, सुट्टा १५०-२००, शेवंती : १५०-३००, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : ४०-६०, गुलछडी काडी : १००-१५०, डच गुलाब (२० नग) : १००-२००, जर्बेरा : ६०-१००, कार्नेशियन : १५०-२५०, शेवंती काडी ३००-४००, लिलियम (१० काड्या) ८००-१०००, ऑर्किड ३५०-६००, जिप्सोफिला : ३००-४००, जुई : १२००-१५००.


