वडूज (प्रतिनिधी) -खटाव तालुक्यातील बनपुरी येथील शनिवारी रात्री आणखी पाच जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. एकाच दिवशी सापडलेल्या पाच बाधितांमुळे बनपुरीला करोनाने चांगलाच दणका दिला असून संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे, 21 तारखेस 43 लोकांची गाडी राजस्थानमधील कोटा येथून बनपुरी येथे आली होती. या गाडीमध्ये बनपुरी येथील 25, येरळवाडी 4, दातेवाडी 1, तरसवाडी 7, कदमवाडी 4, मायणी 2 अशा लोकांनी प्रवास केला होता. बनपुरी वगळता इतर प्रवाशांना मायणी येथे क्वारंटाइन केले होते. बनपुरी मधील प्रवासी लोकांना बनपुरी शाळेत क्वारंटाइन करण्यात आले होते. यामध्ये एक 38 वर्षीय युवक व त्याचे कुटुंबीय शाळेत न राहता स्वत:च्या घरामध्येच क्वारंटाइन राहिले होते. या युवकाचा अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर संबंधित युवकाच्या कुटुंबीयांची व निकट सहावासित असणाऱ्या लोकांची तपासणी चालू होती. यामध्ये या युवकाची दोन मुले, पत्नी, आई, वडील व कोटा येथून आलेले बनपुरी येथीलच सहप्रवासी अशा तेरा जणांचे घशाचे नमुणे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यामध्ये आई, वडील व इतर काही प्रवासी वगळता पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बनपुरीमध्ये करोनाचा स्फोट झाल्यासारखी अवस्था निर्माण झाली आहे. या अहवालानुसार दोन मुले, दोन स्त्रिया, एक पुरुष असा समावेश आहे.