RBI रेपो दर कपातीनंतर बँकांकडून व्याजदरात कपात सुरू; बडोदा बँक आणि एचडीएफसी बँकेचा समावेश

नवी दिल्ली – शुक्रवारी रिझर्व बँकेने व्याजदर कपातीबरोबरच रोख राखीव प्रमाणात कपात केल्यामुळे व्यावसायिक बँकांनी व्याजदरात कपात करण्यास सुरुवात केली आहे. काही बँकांनी शुक्रवारी लगेच व्याजदरात कपात केली होती. नंतर बँक ऑफ बडोदा आणि एचडीएफसी बँकेनेही आपल्या विविध कर्जावरील व्याजदरात 0.50% पर्यंत कपात जाहीर केली आहे.
बँक ऑफ बडोदा या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने दिलेल्या माहितीनुसार या बँकेने रेपो संलग्न कर्जावरील व्याजदरात 0.50% ची कपात जाहीर केली आहे. खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ट लेंडिंग रेट म्हणजे एमसीएलआर दरात 0.10 टक्क्यांची कपात केली आहे. त्यामुळे या पद्धतीच्या कर्जाशी संबंधित व्याजदर कमी होणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी सात जून पासून सुरू झाली आहे.
शुक्रवारी रिझर्व बँकेने अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजे 0.50% इतकी रेपो दर कपात केली. त्याचबरोबर रोख राखीव प्रमाण 1 टक्क्याने कमी केले. त्यामुळे व्यवसायिक बँकांना आपल्या विविध कामासाठी वापरण्याकरिता अडीच लाख कोटी रुपयांची रक्कम उपलब्ध होणार आहे.
फेब्रुवारी महिन्यापासून रिझर्व बँकेने व्याजदरात एकूण एक टक्का कपात केली आहे. मात्र आगामी काळामध्ये व्याजदर कपात लवकर होण्याची शक्यता नाही असे रिझर्व बँकेच्या पत धोरण समितीने शुक्रवारी स्पष्ट केले.
बडोदा बँकेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, रिझर्व बँकेने रेपोत अर्धा टक्के कपात केल्या नंतर आम्ही रेपो लिंक लेंडिंग रेट म्हणजे आरएलएलआर मध्ये 0.50% ची कपात केली असून या निर्णयाची अंमलबजावणी सात जून पासून सुरू झाली असे समजले जाणार आहे. आता या बँकेचा आरएलएलआर 8.15 टक्के राहणार आहे. बँकेने आता स्पष्ट केले की, आम्ही रिझर्व बँकेने जेवढी व्याजदर कपात केली तेवढीच व्याजदर कपात ग्राहकांच्या कर्जावरील व्याजदरात केली आहे.





