रुपयाचे मूल्य सुधारण्यासाठी बॅंकांकडून डाॅलरची विक्री

मुंबई – व्यापार युद्धामुळे डॉलर वधारत असल्यामुळे रुपयाच्या मूल्यात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. मात्र ही घसरण रोखण्यासाठी कालपासून रिझर्व बँक मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करत आहे. काल शेअर बाजारात नकारात्मक वातावरण असूनही रिझर्व बँकेने केलेल्या हस्तक्षेपामुळे रुपयाचे मूल्य घसरले नव्हते. आज शेअर बाजाराचे निर्देशांक दीड टक्क्यांनी घसरले.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची विक्री चालू असूनही रुपयाचे मूल्य 63 पैशांनी वाढून रुपयाचा भाव 86 रुपये 82 पैसे प्रति डॉलर या पातळीवर गेला. दोन वर्षात प्रथमच एखाद्या दिवशी रुपयाचे मूल्य एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे चलन बाजारातील व्यापार्यांनी सांगितले. या अगोदर तीन मार्च 2023 रोजी रुपयाचा भाव 63 पैशांनी वाढला होता.
रिझर्व बँकेच्या सूचनेनुसार भारतातील बँकांनी मंगळवारी डॉलरची बरीच विक्री केल्यामुळे रुपयाचे मूल्य सुधारण्यास मदत झाली असल्याचे दिसून येते. काल सकाळच्या सत्रात रुपयाचा भाव 45 पैशांनी कोसळला होता. मात्र नंतर रिझर्व बँकेच्या हस्तक्षेपामुळे रुपयाच्या मूल्यात सुधारणा झाली होती. दरम्यान अमेरिकेच्या धोरणामुळे डॉलर वधारत आहे.
सहा मुख्य चलनाच्या तुलनेत डॉलरचे मूल्य दर्शविणारा डॉलर इंडेक्स मंगळवारी 0.01 टक्क्यांनी वधारून 108.18 अंकावर गेला. सध्याच्या परिस्थितीत रुपयाचे मूल्य कोणत्या पातळीवर स्थिर होईल हे सांगता येत नाही असे मीराए असेट शेरखान या कंपनीचे विश्लेषक अनुज चौधरी यांनी सांगितले.
खनिज तेल महागले
रुपयाच्या दृष्टिकोनातून आणखी एक चिंतेची बाब म्हणजे आतापर्यंत खनिज तेलाच्या किमती कमी होत्या. मात्र आता यामध्ये वाढ होत आहे. व्यापार युद्धाचा भडका उडाल्यानंतर आज खनिज तेलाचे दर सव्वा टक्क्यांनी वाढून 76.80 डॉलर प्रत्येक पिंप या पातळीपर्यंत गेले. जर खनिज तेल महाग होत राहिले तर रुपयाच्या मूल्यावर आणखी दबाव येऊ शकतो.



