बॅंक ग्राहकांचे पैसे लुटणाऱ्या सराईतास बेड्या!

पोलिसांची कामगिरी :आरोपींकडून पाच लाखांची रोकड केली हस्तगत
मोटारीची डिकी उघडून 4 लाख 80 हजार रुपये केले होते लंपास

अटक आरोपींकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्‍यता

राजगुरूनगर – बॅंकेत पैसे काढणाऱ्या ग्राहकांवर पाळत ठेवून रोख रक्‍कम चोरून नेणाऱ्या चोरट्यास खेड पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून अनेक गुन्हे उघड झाले असल्याची माहिती खेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरविंद चौधरी यांनी दिली.

गोगुला राजा (वय 47 रा. सध्या रा. 108 कालवा रेती बंदर जि. ठाणे, मूळगाव वाडीपट्टी, ता. मदुराई, तामिळनाडू) असे अटक केलेल्या सराईत चोरट्याचे नाव आहे. पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी दिलेली माहिती अशी की, राजगुरूनगर शहरात दि. 11 मार्च 2019 रोजी हर्षल रमेश कुमठेकर (वय 31 रा. चांडोली) या युवकाने शहरातील एका बॅंकेतून 4 लाख 80 हजार रुपये काढून तो घरी जात होता. चांडोली येथील त्यांच्या घराचे बांधकाम पाहण्यासाठी त्याने दुचाकी बाजूला लावली होती.गाडीच्या डिकीमध्ये ही रक्कम ठेवली होती. त्याचा पाठलाग करून अज्ञात व्यक्‍तीने डिकी उघडून 4 लाख 80 हजार रुपये चोरून नेले होते. त्यानंतर कुमठेकर यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

खेड विभागाचे पोलीस उपाधीक्षक गजानन टोम्पे यांनी या चोरट्यांना तात्काळ मुद्देमालासह पकडण्यासाठी खेड पोलिसांना आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पडवळ, पोलीस नाईक संजय नाडेकर, संतोष मोरे, शिवाजी बनकर, विकास पाटील, प्रवीण गेंगजे, शेखर भोईर गेली काही दिवसांपासून पेट्रोलिंग करीत होते. शनिवारी (दि. 29 मार्च) सकाळी अकराच्या सुमारास येथील स्टेट बॅंकेच्या बाजार समिती जवळील शाखेजवळ एक व्यक्‍ती संशयास्पद हालचाली करीत असल्याचे पोलिसांना दिसले. त्यास थांबवून विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली व पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यास पकडले. त्याला खेड पोलीस ठाण्यात नेवून पोलिसी खाक्‍या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरलेली 4 लाख 80 हजार रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत.

आठवड्यात दुसरी कारवाई

राजगुरूनगर शहरात जानेवारीपासून महिलांचे दागिने चोरणाऱ्या सराईतास आठ दिवसांपूर्वी जेरबंद करून मुद्देमाल हस्तगत केला होता. त्यानंतर पुन्हा दुचाकीच्या डिकीतून रोख रक्कम चोरून नेणाऱ्या चोरट्यास जेरबंद केले आहे. गेल्या काही दिवसांपासून खेड तालुक्‍यात कडूस, पाईट, वाडा, चास, दावडी, कन्हेरसर, चाकण, महाळुंगे इंगळे, शेलपिंपळगाव, कनेरसर आदी भागात चोरट्यांनी दहशत निर्माण केली आहे. याशिवाय सकाळी आणि संध्याकाळी घराबाहेर पडणाऱ्या महिलांवर चोरटे पाळत ठेवत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.