“जर मशिद अन् चर्चमध्ये नसेल तर…” ; बांके बिहारी मंदिर ट्रस्टच्या स्थापनेवर रामभद्राचार्य संतापले

Banke Bihari Temple। प्रसिद्ध रामकथा कथाकार आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या वृंदावनमधील ठाकूर बांके बिहारी मंदिराचा ताबा घेण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याविषयी बोलताना त्यांनी,”
जर मशिदी आणि चर्चविरुद्ध असे पाऊल उचलता येत नसेल, तर मंदिरांच्या बाबतीतही असे पाऊल उचलले जाऊ नये.” असे स्प्ष्टपणे त्यांनी म्हटले.
मंदिरासाठी ट्रस्ट स्थापन करण्याच्या आणि बांके बिहारी कॉरिडॉर विकसित करण्याच्या राज्य सरकारच्या योजनेवर विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी ही टिप्पणी केली. रामभद्राचार्य सध्या मथुरेच्या वृंदावनात आहेत. गेल्या एका आठवड्यापासून ते तुळशीपीठ छत्तीसगड कुंज येथे श्रीमद् भागवत कथा पठण करत आहेत.
कथाकार रामभद्राचार्य यांनीही मंदिरासाठी ट्रस्ट स्थापन करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरुद्ध आपला निषेध नोंदवला आणि आपली नाराजी व्यक्त केली. त्यांनी, “मला समजत नाही की जेव्हा सरकार मशीद किंवा चर्चवर नियंत्रण ठेवू शकत नाही, तेव्हा ते मंदिराचा ताबा का घेऊ इच्छिते आणि त्याचा निधी का हडप करू इच्छिते?.” असे काही सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केले.
संपूर्ण प्रकरण काय आहे? Banke Bihari Temple।
उत्तर प्रदेश सरकारने एका अध्यादेशाद्वारे मंदिरात येणाऱ्या लाखो भाविकांसाठी चांगल्या सुविधांची आवश्यकता असल्याचे कारण देत ट्रस्टची स्थापना आणि कॉरिडॉर बांधण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात यासंदर्भातील अध्यादेशही आणण्यात आला. या विधेयकात सरकारने मंदिराच्या परंपरेचे रक्षण, व्यवस्थापन मजबूत करणे आणि आधुनिक सुविधांसाठी अनेक तरतुदी समाविष्ट केल्या आहेत. १८ सदस्यांचा ट्रस्ट मंदिराच्या व्यवस्थापनासह सर्व कामे करेल. विधेयकानुसार, २० लाखांपर्यंतच्या व्यवहारांसाठी ट्रस्टला स्वतंत्र अधिकार असेल.
जर २० लाखांपेक्षा जास्त व्यवहार करायचा असेल तर त्यासाठी सरकारची परवानगी घेणे बंधनकारक असेल. बांके बिहारी मंदिराच्या दानपेट्या, देणग्या आणि सर्व जंगम आणि अचल मालमत्तेवर ट्रस्टचा अधिकार असेल. मंदिराच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांमध्ये कोणताही हस्तक्षेप होणार नाही, असेही सरकारने स्पष्ट केले आहे. Banke Bihari Temple।





