पुणे – पुण्यात मुख्य कार्यालय असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने दुसर्या तिमाहीचा नफादायक ताळेबंद जाहीर केला. या तिमाहीत बँकेला झालेला नफा 23 टक्क्यांनी वाढून 1,633 कोटी रुपये इतका झाला आहे. बँकेची अनुत्पादक मालमत्ता कमी झाल्यामुळे आणि व्याजातील उत्पन्न वाढल्यामुळे या तिमाहीत बँकेच्या नफ्यात वाढ झाली. गेल्या वर्षी या तिमाहीत बँकेला 1,327 कोटी रुपयांच नफा झाला होता. या तिमाहीत बँकेला व्याजातून 7,128 कोटी रुपये मिळाले आहेत. गेल्या वर्षीही रक्कम 6,017 कोटी रुपये होती. या तिमाहीत बँकेचे एकूण उत्पन्न वाढून 7,973 कोटी रुपये झाले. गेल्या वर्षी ही रक्कम 6,809 कोटी रुपये होती. बँकेने कर्ज वसुलीवर भर दिला आहे. त्याचबरोबर नवी कर्ज देताना काळजी घेण्यात येत आहे. परिणामी या तिमाहीत बँकेची ढोबळ अनुत्पादक मालमत्ता कमी होऊन केवळ 1.72% इतकी झाली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरअखेर ही अनुत्पादक मालमत्ता 1.84% इतकी होती. या तिमाहीत बँकेची निव्वळ अनुत्पादक मालमत्ता केवळ 0.18% इतकी नोंदली गेली आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत निव्वळ अनुत्पादक मालमत्ता 0.2% इतकी होती. बँकेने हाती घेतलेल्या कर्ज वसुली मोहिमेला चांगले यश मिळत आहे. त्याचबरोबर व्याजातून उत्पन्न वाढत आहे. अशा परिस्थितीत बँकेचा ताळेबंद चमकदार होण्यास मदत झाली आहे. आगामी सहा महिन्यातही या आघाडीवर बँकेला यश मिळण्याची शक्यता असल्याचे बँकेच्या व्यवस्थापनाने नमूद केले आहे. बँकेने नफादायक ताळेबंद जाहीर केला असला तरी बँकेच्या शेअरचा भाव मंगळवारी 3.77 टक्क्यांनी कमी होऊन 55.4 रुपये प्रति शेअर या पातळीवर होता.