पुणे – सार्वजनिक क्षेत्रामधील देशातील नामवंत बॅंक ऑफ महाराष्ट्रने दि. 7 नोव्हेंबरपासून रेपोलिंक्ड् लेन्डिंग रेटमध्ये (आरएलएलआर) आधीच्या 7.05% पासून 6.90% पर्यंत घट करण्याचे जाहीर केले आहे.
सर्व रिटेल आणि एमएसएमई कर्ज “आरएलएलआर’शी संलग्न (एक्स्टर्नल बेंचमार्क- रेपोलिंक्ड्) रेटशी जोडलेली असल्यामुळे गृहकर्ज, कार कर्ज, शैक्षणिक कर्ज वैयक्तिक कर्ज व एमएसएमई कर्जाच्या ग्राहकांना याचा लाभ होणार आहे.
सणासुदीच्या निमित्ताने बॅंकेने यापूर्वीच गृहकर्ज, कारकर्ज व सोने कर्जावर प्रोसेसिंग फी माफ केली आहे. आता “आरएलएलआर’मध्ये घट केल्यामुळे गृह कर्जदर 6.95% पासून सुरू होतील (महिला व डिफेन्स कर्मचाऱ्यांना 0.05% सवलत) तर कार कर्जदर 7.55% तर, सोने कर्जदर 7.35% पासून सुरू होतील.
“आरएलएलआर’ व्याजाचा दर कमी झाल्यामुळे आमचे गृहकर्ज, कारकर्ज, सोनेकर्ज, शैक्षणिक कर्ज, वैयक्तिक कर्ज व एमएसएमई कर्जही सर्वाधिक आकर्षक व किफायतशीर बनली आहेत आणि यामुळे या उत्सवी दिवसांत ग्राहकांचा आनंद नक्कीच द्विगुणीत होणार आहे, असा विश्वास बॅंकेचे कार्याकारी संचालक हेमंत टम्टा यांनी व्यक्त केला आहे.