Bank Holidays: जर तुमची बँकांची काही काम असतील तर लवकरात लवकर करून घ्या आणि त्यातही तुमचे खाते जर भारतीय स्टेट बँकेत (SBI) खाते असेल आणि तुम्हाला शाखेत जाऊन काही महत्त्वाचे काम करायचे असेल, तर ते लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. कारण बँक सलग सहा दिवस बंद राहणार आहे, येत्या 23 मे 2026 पासून देशातील सर्वात मोठ्या बँकेच्या शाखा तब्बल सहा दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. ही बंदी देशभरातील अनेक भागांमध्ये लागू होऊ शकते. मात्र या काळात ऑनलाइन सेवा सुरू राहणार आहेत. ग्राहक नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, एटीएम, यूपीआय आणि इतर डिजिटल सेवांचा वापर करू शकतील. पण शाखेत प्रत्यक्ष जाऊन कराव्या लागणाऱ्या कामांसाठी ग्राहकांना 23 मेपूर्वीच नियोजन करावे लागणार आहे. SBI सहा दिवस का बंद राहू शकते? Bank Holidays: SBI शाखा सलग सहा दिवस बंद राहण्यामागे अनेक कारणे आहेत. यामध्ये चौथा शनिवार, रविवार, प्रस्तावित दोन दिवसांचा संप आणि ईद-उल-अजहा (बकरी ईद) निमित्त आरबीआयने जाहीर केलेल्या सुट्ट्यांचा समावेश आहे. Bank Holidays: कोणत्या दिवशी बँका बंद राहणार? 23 मे 2026: महिन्याचा चौथा शनिवार असल्याने बँका बंद 24 मे 2026: रविवारची नियमित सुट्टी 25 आणि 26 मे 2026: SBI कर्मचाऱ्यांचा प्रस्तावित संप 27 आणि 28 मे 2026: ईद-उल-अजहा निमित्त काही भागांत सुट्टी यामुळे अनेक शाखांमध्ये कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. संप का पुकारण्यात आला आहे? ‘ऑल इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ फेडरेशन’ने 25 आणि 26 मे 2026 रोजी दोन दिवसांच्या संपाची घोषणा केली आहे. हा संप भरती प्रक्रिया आणि नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) फंड मॅनेजर निवडीसंबंधी मुद्द्यांवरून पुकारण्यात आला आहे. याशिवाय फेडरेशनने नोकऱ्यांचे आउटसोर्सिंग, SBI मधील समानतेचे प्रश्न, करिअर प्रगती योजनेचा आढावा, HRMS प्रणाली आणि कर्मचाऱ्यांवर परिणाम करणाऱ्या इतर मुद्द्यांबाबतही चिंता व्यक्त केली आहे. ईद-उल-अजहा निमित्त सुट्ट्या आरबीआयने ईद-उल-अजहा निमित्त सुट्टी जाहीर केली आहे. देशातील काही भागांत हा सण 27 मे रोजी तर काही भागांत 28 मे रोजी साजरा केला जाणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये हा सण दोन्ही दिवशी साजरा केला जाणार असल्याने तेथे सलग दोन दिवस बँका बंद राहतील. ऑनलाइन सेवा सुरूच राहणार Bank Holidays: SBI कर्मचारी या संपात सहभागी होण्याची शक्यता असल्याने शाखांमधील अनेक सेवा विस्कळीत होऊ शकतात. मात्र ग्राहकांना डिजिटल सेवांचा वापर सुरू ठेवता येणार आहे.