Bank Account Rules: पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत (PMJDY) उघडलेल्या शून्य बॅलन्स खात्यांमध्ये (Zero Balance Account) आता एक विशेष सुविधा मिळत आहे, ज्यामुळे खातेदारांना त्यांच्या खात्यात पैसे नसतानाही 10 हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. ही सुविधा ‘ओव्हरड्राफ्ट’ (Overdraft) म्हणून ओळखली जाते आणि अडचणीच्या वेळी खातेदारांसाठी हा मोठा आधार ठरत आहे. जन धन योजनेत उघडलेली सर्व खाती ही ‘बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट अकाउंट’ (BSBDA) प्रकारची असतात. या खात्यांमध्ये किमान रक्कम (Minimum Balance) ठेवण्याची कोणतीही सक्ती नसते. यासोबतच, या खात्यांच्या धारकांना 10 हजार रुपयांपर्यंतच्या ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ मिळतो. याचा अर्थ असा की, जर तुमच्या खात्यात रक्कम नसेल किंवा बॅलन्स शून्य असेल, तरीही तुम्ही मर्यादेपर्यंत पैसे काढू शकता. या सुविधेमुळे कोणतीही अचानक आलेली आर्थिक अडचण दूर करणे सोपे होते. २ लाख रुपयांचा अपघात विमा – जन धन खातेदारांना मिळणाऱ्या या ओव्हरड्राफ्ट सुविधेव्यतिरिक्त, आणखी एक मोठा फायदा मिळतो, तो म्हणजे RuPay डेबिट कार्डावर २ लाख रुपयांपर्यंतचा अपघात विमा (Accident Insurance). यामुळे खातेदाराला आर्थिक सुरक्षा मिळते. काय असतो ‘ओव्हरड्राफ्ट’ (Overdraft)? ‘ओव्हरड्राफ्ट’ म्हणजे अशी सुविधा, जिथे बँक तुम्हाला तुमच्या खात्यात उपलब्ध नसलेली रक्कम काढण्याची तात्पुरती परवानगी देते. सोप्या भाषेत बँक तुम्हाला थोड्या कालावधीसाठी ‘कर्ज’ देत आहे असे समजू शकता. तुम्ही काढलेली ही रक्कम नंतर जेव्हा तुमच्या खात्यात पैसे जमा होतील, तेव्हा बँकेला परत करावी लागते. या ओव्हरड्राफ्ट रकमेवर तुम्हाला काही प्रमाणात व्याज (Interest) भरावे लागते. ओव्हरड्राफ्टमुळे अकाउंटमध्ये पैसे नसतानाही, तातडीच्या खर्चासाठी त्वरित रोकड (Cash) उपलब्ध होते.