Bangladesh – बांगलादेशमध्ये बुधवारी शांतता होती पण तणाव कायम होता. सुरक्षा दलांनी प्रमुख शहरांमध्ये कडक पहारा ठेवला होता. ढाका आणि इतर प्रमुख शहरी केंद्रांमध्ये वाहतूक प्रवाह आणि दैनंदिन व्यवहार हळूहळू सामान्य होण्याचे संकेत दिसत आहेत, सलग दुसऱ्या दिवशी हिंसाचाराची कोणतीही घटना घडली नाही. तथापि अवामी लीगने बुधवारपासून तीन दिवसांच्या देशव्यापी आंदोलन, निदर्शने आणि प्रतिकाराच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर, सशस्त्र पोलिस, रॅपिड अॅक्शन बटालियन आणि निमलष्करी दलांनी सरकारी इमारती, पक्ष कार्यालये आणि राजधानीतील प्रमुख चौकांमध्ये गस्त सुरू ठेवली. गाजीपूर शहरात, एका जुबो दल नेत्याच्या मालकीच्या गोदामाला आग लागली. त्यामुळे सामान जळून खाक झाले. मात्र या आगीमागे घातपात होता का अपघात होता, हे स्पष्ट होऊ शकले नाही. जुबो दल ही खालिदा झिया यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीची युवा शाखा आहे. दरम्यान सुरक्षा मोहिमांचा भाग म्हणून सोमवार आणि मंगळवारी देशभरात टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये १,६४९ लोकांना अटक करण्यात आली. या छाप्यांदरम्यान दहा बंदुका, ३०.५ किलो गनपावडर, दारूगोळा आणि कॉकटेल बॉम्ब जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.