ढाका – भारत-बांगलादेशदरम्यानच्या सीमेवरील तणावाच्या मुद्यावरून बांगलादेशने आज ढाक्यातील भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना आज परराष्ट्र मंत्रालयात पाचारण केले होते. भारत-बांगलादेश सीमेवर भारताकडून कुंपण घालण्याचा प्रयत्न केला जातो आहे. भारताच्या या कृतीमुळे द्विपक्षीय कराराचा भंग होत असल्याचा आरोप बांगलादेशकडून करण्यात येतो आहे.
ढाक्यातील भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा दुपारी ३ वाजता बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात गेले होते. बांगलादेशचे परराष्ट्र सचिव जशिम उद्दीन यांच्याबरोबर वर्मा यांची बैठक सुमारे ४५ मिनिटे चालली, असे बांगलादेशच्या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेबद्दल बांगलादेशच्या हंगामी सरकारकडून कोणतेही अधिकृत निवेदन प्रसिद्धीस देण्यात आलेले नाही.
मात्र भारत-बांगलादेशच्या सीमेवर सुरक्षेसाठी कुंपण घालण्याच्या मुद्यावरून दोन्ही देशांमध्ये सामंजस्य असल्याचे वर्मा यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
बीएसएफ आणि बीजीबीमध्ये या संदर्भात संवाद सुरू आहे. या संदर्भातील सामंजस्यानुसार याची अंमलबजावणी केली जाईल आणि सीमाबागातील गुन्ह्यांना रोखण्यासाठी सहकार्याची भूमिका घेतली जाईल, अशी आम्हाला आशा वाटते, असेही त्यांनी म्हटले आहे.
बांगलादेश बॉर्डर गार्ड आणि स्थानिकांनी आक्षेप घेतल्यामुळे भारताने सीमेवर काटेरी कुंपण घालण्याचे काम थांबवल्याचा दावा बांगलादेशच्या गृह खात्याचे सल्लागार ले.जन. (नि.) जहांगीर चौधरी यांनी कालच केला होता.