Bangladesh Hindu Killed – बांगलादेशात हिंदू अल्पसंख्यांकांवरील हल्ल्यांच्या घटना सुरूच असून आज आणखी एका हिंदू युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ‘मिथून सरकार’ असे या हिंदू युवकाचे नाव असून काही समाजकंटकांकडून त्याचा पाठलाग केला जात असताना पाण्यात पडल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला. बांगलादेशातील नाओगाव जिल्ह्यातल्या मोहादेवपूर भागात ही घटना घडली. मिथुन सरकार हा चोर असल्याचा आरोप करत काही समाजकंटकांनी त्याचा पाठलाग सुरू केला होता. स्वतःला जमावापासून वाचवण्यासाठी मिथुन याने एका तळ्यात उडी मारली. तेथेच बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने तळ्यातून त्याचा मृतदेह बाहेर काढला, असे नाओगावचे पोलिस अधीक्षक मोहम्मद तारिकुल इस्लाम यांनी सांगितले. मिथुनच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले जात असून या प्रकरणी चौकशी सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र या प्रकरणी अधिक माहिती दिली नाही.