ICC Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर नव्या सेंट्रल काँट्रॅक्टची घोषणा; ‘या’ 5 खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता

काही दिवसांपूर्वीच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा संपली. या स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पार पडला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले. यानंतर आता बांगलादेश क्रिकेट बोर्डाने 2025 सालासाठी केंद्रीय करार जाहीर केला आहे. या करारानुसार बांगलादेश बोर्डाने खेळाडूंना ग्रेडच्या आधारावर मासिक वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने नव्या सेंट्रल काँट्रॅक्टमधून पाच खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तसेच 22 खेळाडूंना सेंट्रल काँट्रॅक्टमध्ये स्थान दिलं आहे. तसेच पाच वेगवेगळ्या ग्रेडमध्ये खेळाडूंची विभागणी केली आहे. विशेष म्हणजे एकाच खेळाडूला ग्रेड ए+ मध्ये स्थान मिळालं आहे. तर ग्रेड ए मध्ये चार खेळाडूंना सहभागी केलं आहे.
‘या’ खेळाडूंना सेंट्रल काँट्रॅक्टमधून दाखवला बाहेरचा रस्ता
पाच खेळाडूंना बांगलादेश क्रिकेट बोर्डाने नवीन केंद्रीय करारातून वगळले आहे. शाकिब अल हसन, झाकीर हसन, महमूदुल हसन जॉय, नईम हसन आणि नुरुल हसन यांचा यामध्ये समावेश आहे. हे खेळाडू या अगोदर केंद्रीय करारात होते आता त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
ग्रेड ए+ मध्ये स्थान देण्यात आलेले खेळाडू
स्टार वेगवान गोलंदाज तस्किन अहमद हा ग्रेड ए+ मध्ये असलेला एकमेव खेळाडू आहे. त्याला या वर्षी दरमहा 10 लाख बांगलादेशी टाका म्हणजेच अंदाजे 7 लाख 20 हजार रुपये मिळतील.
ग्रेड ए मध्ये स्थान देण्यात आलेले खेळाडू
नझमुल हुसेन शांतो, मेहदी हसन मिराज आणि लिटन दास यांना ग्रेड ए मध्ये स्थान देण्यात आले आहे. या खेळाडूंना दरमहा अंदाजे 5 लाख 75 हजार रुपये दिले जातील.
ग्रेड बी मध्ये स्थान देण्यात आलेले खेळाडू
मोमिनुल हक, तैजुल इस्लाम, मुशफिकुर रहीम, मुस्तफिजुर रहमान, तौहिद हृदयॉय, हसन महमूद, नाहिद राणा यांना ग्रेड बी मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. या खेळाडूंना दरमहा अंदाजे 4 लाख 31 हजार रुपये दिले जातील.
ग्रेड सी मध्ये स्थान देण्यात आलेले खेळाडू
ग्रेड सी मध्ये शादमान इस्लाम, सौम्या सरकार, जकार अली, तन्जीद हसन, शोरीफुल इस्लाम, रिशाद हुसेन, तन्जीम हसन आणि मेहेदी हसन यांचा समावेश आहे.
ग्रेड डी मध्ये स्थान देण्यात आलेले खेळाडू
नसुम अहमद आणि खालिद अहमद यांना ग्रेड डी मध्ये स्थान देण्यात आले आहे. या खेळाडूंचा करार हा तीन वर्षांसाठी असणार आहे.





