Bangladesh News : न्यायाधीशांचे बारतातील प्रशिक्षण बांगलादेशकडून रद्द

ढाका : बांगलादेशातील न्यायाधीशांचे भारतात नियोजित केले गेलेले प्रशिक्षण बांगलादेशातील हंगामी सरकारकडून रद्द करण्यात आले आहे. न्यायपालिकेतील 50 न्यायाधीश आणि न्यायिक अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण भारतात केले जाणार होते. यासंदर्भातील अधिसूचना हंगामी सरकारकडून रद्द करण्यात आली आहे. कायदा मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी याबाबतची माहीती दिली. मात्र त्या संदर्भातील कोणताही तपशील दिला गेला नाही.
बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार भारतात होणारे प्रशिक्षण रद्द करण्यात आले असल्याचे बांगलादेशातून प्रसिद्ध होणाऱ्या वर्तमानपत्राने म्हटले आहे. एकच दिवस आगोदर बांगलादेशातील सरकारी वृत्तसंस्थेने ५० न्यायाधीशांना भारतात एक दिवसाचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. हे प्रशिक्षण दिनांक १० फेब्रुवारी रोजी मध्यप्रदेशातील नॅशनल ज्युडिशियल अकॅडमी आणि स्टेट ज्युडिशियल अकॅडमी येथे होणार होते. या एक दिवसाच्या प्रशिक्षणासाठी जिल्हा आणि सत्र न्यायालयांच्या न्यायाधीसांची किंवा त्यांच्या समकक्ष अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली होती.
या प्रशि७ण कार्यक्रमाचा खर्च भारत सरकार करणार होते. बांगलादेशात सत्तांतर झाल्यापासून भारत आणि बांगलादेशादरम्यानच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. बांगलादेशातल्या हिंदूंच्या घरांवर, मंदिरांवर हल्ले करण्यात आले आहेत. विशेषतः हिंदू साधू चिन्मय कृष्ण दास यांना झालेल्या अटकेसंदर्भात भारत सरकारने बांगलादेशातील हंगामी सरकारकडे चिंता व्यक्त केली आहे.





