बांगलादेश नरमला! भारताशी चर्चा करण्यासाठी साधला संपर्क, मोदी- मोहम्मद युनूस यांच्यात द्विपक्षीय बैठक होण्याची शक्यता

नवी दिल्ली/ढाका- बांगलादेशातील अल्पसंख्याकांवरील हिंसाचार आणि भारतासोबतच्या संबंधांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशने भारताशी संपर्क साधला आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, बांगलादेशने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बँकॉकमध्ये मोहम्मद युनूस आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात द्विपक्षीय बैठक आयोजित करण्यासाठी भारताशी संपर्क साधला आहे.
दोन्ही देशांचे नेते २ ते ४ एप्रिल दरम्यान बँकॉकमध्ये आयोजित सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेत सहभागी होऊ शकतात. त्या पार्श्वभूमीवरच बांगलादेशने दोन्ही नेत्यांमधील बैठक आयोजित करण्यासाठी संपर्क साधला आहे.
बांगलादेशच्या अंतरिम सरकारमधील परराष्ट्र व्यवहार सल्लागार मोहम्मद तौहिद हुसेन यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, बिमस्टेक शिखर परिषदेदरम्यान दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये द्विपक्षीय बैठक आयोजित करण्यासाठी आम्ही भारताशी राजनैतिक संपर्क साधला आहे. त्याच वेळी, बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस हे २८ मार्च (शुक्रवार) रोजी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
गेल्या महिन्यात फेब्रुवारीमध्ये बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार मोहम्मद तौहिद हुसेन यांनी ओमानमध्ये झालेल्या परिषदेत भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली होती. या बैठकीबाबत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले होते की, दोन्ही देशांमधील बैठक द्विपक्षीय संबंधांवर आणि बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी-सेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशनच्या मुद्द्यावर केंद्रित होती. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार मोहम्मद तौहिद हुसेन यांची भेट घेतली. या दरम्यान आम्ही दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली.
त्याच वेळी, बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयानेही याबाबत एक निवेदन जारी केले. निवेदनात म्हटले आहे की, परस्पर चिंता आणि हित लक्षात घेऊन दोन्ही बाजूंनी विविध द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.





