Bangladesh – बांगलादेशात आणखी एका हिंदू व्यापाऱ्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. सोमवारी काही अज्ञात बंदूकधाऱ्यांनी जेसोर जिल्ह्यातल्या काशाबपूर भागात राणा प्रताप बजरंगी या व्यापाऱ्याऱ्याची गोळ्या घालून हत्या केली, असे बांगलादेश पूजा उत्सव समितीचे अध्यक्ष बासुदेब धर म्हणाले. बजरंगी हे केशबपूर उपजिल्ह्यातल्या खुलना विभागातल्या अरुआ गावचे रहिवासी होते. मोनिरामपूर येथील कोपालिया बझार भागात बर्फ तयार करण्याची फॅक्टरीचे ते मालक होते. याशिवाय दैनिक बीडी खबर या दैनिकाचे ते संपादक देखील होते. सोमवारी सायंकाळी ५:४५ वाजता कोपलिया बाजारात ही घटना घडली. मोटारसायकलवरून आलेल्या तीन गुंडांनी त्यांना बर्फाच्या कारखान्यातून बोलावले आणि आपल्याबरोबर जवळच्या गल्लीत घेऊन गेले. त्यानंतर हल्लेखोरांनी जवळून त्यांच्या डोक्यात गोळी झाडली आणि ते पळून गेले. त्यात बजरंगी यांचा जागीच मृत्यू झाला. बजरंगी यांच्या डोक्यात ३ गोळ्या मारल्या गेल्या होत्या. त्यांचा गळाही चिरला गेला होता. या हत्येमागील हेतू स्पष्ट झाला नाही, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. यापुर्वी खोकोन चंद्र दास, अमृत मोंडल, दीपू चंद्र दास आणि एका अन्य अज्ञात हिंदू व्यक्तीची अशाच प्रकारे हत्या करण्यात आली आहे. हिंदू अल्पसंख्यांना लक्ष्य करण्याचे बांगलादेशातील सत्र सुरू असल्याचे या हत्या प्रकरणामुळे पुन्हा अधोरेखित झाले असून बांगलादेशात अल्पसंख्यांवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे.