डोपिंग प्रयोगशाळेवरील बंदी सहा महिन्यांनी वाढवली
नवी दिल्ली – उत्तेजक द्रव्य सेवनविरोधी जागतिक समितीच्या (वाडा) निकषांचे पालन न केल्यामुळे भारताच्या राष्ट्रीय उत्तेजर द्रव्यसेवन चाचणी प्रयोगशाळेवरील (एनडीटीएल) बंदी आणखी सहा महिन्यांनी वाढविण्यात आली आहे. ऑलिम्पिक स्पर्धेच्या तयारीसाठी कसून सराव करत असलेल्या भारतीय खेळाडू तसेच ऑलिम्पिक क्रीडा प्रकारातील संघटनांना बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे.
वाडाच्या नियमांचे तसेच निकषांचे पालन न केल्याने पहिल्यांदा ही सहा महिन्यांची बंदी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये लावण्यात आली होती. त्यात पुन्हा सहा महिन्यांची वाढ करण्यात आली आहे. आता या कालावधीत प्रयोगशाळेने घेतलेले विविध खेळाडूंचे नमुने दोहा येथील वाडाच्या अधिकृत प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येणार आहेत. या बंदीचा कालावधी पुढील वर्षी जानेवारीअखेर संपुष्टात येणार आहे. केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजीजू यांनी वाडाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. वाडाला आम्ही संपर्क केला होता.
काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे हे निकष त्यावेळी पूर्ण करता आलेले नव्हते. मात्र, आता त्यांनी हा बंदीचा कालावधी वाढविल्यामुळे ऑलिम्पिकच्या तयारीच्या दृष्टीने मोठा धक्का बसला आहे. यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू असून वाडा निश्चितच या बंदीबाबत सकारात्मक विचार करेल, अशी अपेक्षाही रिजीजू यांनी व्यक्त केली.