बाळू धानोरकरांची प्रकृती खालावली; एअर ए्म्बुलन्सने दिल्लीला हलवले

नागपूर – राज्यातील कॉंग्रेसचे एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्यांना नागपूर येथून विशेष हवाई रुग्णवाहिकेद्वारे दिल्ली येथे नेण्यात आले आहे. 27 मे रोजी खासदार धानोरकर यांचे वडील नारायण धानोकर यांचे निधन झाले होते. त्यानंतर रविवारी झालेल्या नारायण धानोरकर यांच्या अंत्यविधीमध्येही बाळू धानोरकर उपस्थित राहू शकले नाहीत.
मागील 2 दिवसांपासून बाळू धानोरकर यांच्यावर नागपूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज प्रकृती काही प्रमाणात खालावल्याने त्यांना तात्काळ दिल्ली येथे उपचारासाठी नेण्यात आले.
धानोरकर यांना आतड्यातील इन्फेक्शन झाल्यामुळे त्रास जाणवत होता, अशी माहिती मिळत आहेत. दरम्यान, त्यांचे वडील नारायणराव धानोरकर हे दिर्घ आजाराने ग्रस्त होते. वायच्या 80 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आजच त्यांच्या वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
चंद्रपूरमधील त्यांचे मूळ गाव भद्रावती येथे हा अंत्यविधी पार पडला. मात्र, प्रकृती अस्वस्थतेमुळे बाळू धानोरकर यांना या अंत्यविधीला हजर राहता आले नाहीत.
सुरेश उर्फ बाळू धानोरकर हे चंद्रपूर मतदारसंघातील कॉंग्रेसचे खासदार आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कॉंग्रेस औषधालाही शिल्लक राहणार नाही, असे वाटत असतानाच बाळू धानोरकर यांनी अनपेक्षित विजय मिळवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.
चंद्रपूरच्या मतदारसंघात त्यांनी चक्क केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांना पराभवाची धूळ चारली होती. या निवडणुकीत महाराष्ट्रातून कॉंग्रेसचा एकमेव खासदार निवडून आला होता. त्यामुळे अनेकदा बाळू धानोरकर हे नाव चर्चेत असते.





