बलुचिस्तान : पाकिस्तानच्या बलुचिस्तान या प्रांताने पाकिस्तानपासून स्वतंत्र झाल्याचे घोषित केले आहे. राज्यात अनेक दशकांपासून सुरू असलेला हिंसाचार, जबरदस्तीने बेपत्ता करणे आणि मानवी हक्कांचे उल्लंघन यावरून बलुच नेते मीर यार बलोच यांनी बुधवारी पाकिस्तानपासून स्वातंत्र्य घोषित केले. त्यांनी म्हटले की बलुचिस्तान हा पाकिस्तान नाही. त्यांनी स्वातंत्र्यासाठी भारत आणि जागतिक समुदायाकडून पाठिंबा मागितला आहे. बलुचिस्तानच्या लोकांनी आपला निर्णय दिला आहे. आता जगाने गप्प बसू नये, बलुचिस्तानचे लोक रस्त्यावर उतरले आहेत असे त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांनी भारतीय नागरिकांना, विशेषतः मीडिया, युट्यूबर्स आणि बुद्धिजीवींना, बलुचिस्तानला पाकिस्तानचे स्वतःचे लोक म्हणू नये असे आवाहन केले आहे. आम्ही पाकिस्तानी नाही. आम्ही बलुचिस्तान आहोत. पाकिस्तानचे स्वतःचे लोक पंजाबी आहेत. ज्यांना कधीही बॉम्बस्फोट, जबरदस्तीने बेपत्ता करणे आणि नरसंहाराचा सामना करावा लागला नाही. २७ मार्च १९४८ रोजी बलुचिस्तान पाकिस्तानात सामील होण्याच्या समारंभात बलुचिस्तान नेत्यांच्या प्रतिनिधींच्या स्वाक्षरीचा आणि आंतरराष्ट्रीय किंवा तृतीय देशांच्या सहभागाचा पुरावा देणारा एकही कागदपत्र किंवा कायदेशीर पुरावा पाकिस्तान सादर करू शकला नाही. बलुचिस्तानमध्ये बऱ्याच काळापासून मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन होत आहे. न्यायालयाबाहेरील हत्या आणि मतभेदांचे दमन यांचा त्यात समावेश आहे. पाकिस्तानी सुरक्षा दल आणि सशस्त्र गटांवर मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे असे बलोच म्हणाले. मीर यार बलोच यांनी पाकिस्तानला व्याप्त काश्मीर रिकामे करण्यास सांगण्याच्या भारताच्या निर्णयाचे समर्थन केले. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, बलुचिस्तान भारताच्या निर्णयाचे पूर्ण समर्थन करतो. आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानला ताबडतोब जम्मू आणि काश्मीर सोडण्यास उद्युक्त करावे असे त्यांनी नमूद केले.